बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. तर कधी ते त्यांच्या चमत्काराच्या दाव्यांमुळे चर्चेत असतात. नुकतंच धीरेंद्र शास्त्री यांनी महिलांच्या बाबतीत एक विधान केलं असून त्यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व विधानसभा प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून या विधानाचा निषेध करतानाच परखड शब्दांत टीका केली आहे.
काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री?
दोन दिवसांपूर्वी नोएडामध्ये धीरेंद्र शास्त्री यांचा जाहीर कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी महिलांविषयी विधान केलं. “एखाद्या महिलेच्या कपाळावर कुंकू नसेल, गळ्यात मंगळसूत्र नसेल तर आपण काय म्हणतो? हा प्लॉट रिकामा आहे. जर कुंकू असेल, गळ्यात मंगळसूत्र लटकलं असेल तर आपण लांबूनच समजून जातो की रजिस्ट्रेशन झालंय”, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत.
दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांच्या या विधानावरून जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे. “तो धीरेंद्र शास्त्री नावाचा बाबा म्हणतो ‘स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूर नसेल तर समजावं की हा ‘प्लॉट’ अजून रिकामा आहे.’ असलं घृणास्पद बोलणाऱ्यांची लोक भक्ती करतात?” असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
“पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र आणि कुंकू न लावणाऱ्या असंख्य दुर्दैवी भगिनी आपल्या समाजात आहेत. धीरेंद्रच्या मते ते ‘रिकामे प्लॉट’ असावेत”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी हल्लाबोल केला आहे.