राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते, असं विधान अजित पवारांनी केलं. अजित पवारांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. अजित पवारांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माधव गोळवलकर यांनी संभाजी महाराज हे स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते, असं लिहून ठेवलं आहे. असा दावा जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरद्वारे केला आहे. तसेच त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकांची पानं शेअर केली आहेत. ज्यामध्ये संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिहिलं आहे. सावरकर आणि गोळवलकर यांच्या पुस्तकातील ही पानं असल्याचं आव्हाडांचं म्हणणं आहे. आव्हाडांचं हे ट्वीट सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

हेही वाचा- “मुख्यमंत्र्यांचे भाषण गल्लीतले होते” म्हणणाऱ्या राऊतांना संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “त्याला चाबरेपणा करायची सवय…”

जितेंद्र आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “सावरकरांनी आणि माधव गोळवलकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहून ठेवले आहे? ते वाचा… या शूरवीरास बदनाम करण्याचे काम एका वर्गाकडून अनेकवेळा झाले. सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे ‘स्त्रीलंपट’ आणि ‘व्यसनाधीन’ होते. यावर कोणी बोलेल का?” असा सवाल आव्हाडांनी विचारला.

हेही वाचा- ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ म्हणणाऱ्या अजित पवारांवर संभाजीराजे संतापले; म्हणाले “विकृत…”

“शंभूराजे हे स्वराज्य रक्षक आणि धर्मरक्षकही होते. शिवाजी महाराजांनी रयतेसाठी जे स्वराज्य निर्माण केलं, त्याचं रक्षण करण्याचं काम शंभूराजेंनी केलं. त्यांना धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म सगळ्यांना सामावून घेणारा मराठा धर्म अभिप्रेत होता. त्यामुळे स्वराज्य आणि धर्म बाजुला कसे काढता येईल?” असंही आव्हाड आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.

Story img Loader