अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. अजित पवार यांनी भाजपाशी हातमिळवणी करत ते सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी रविवारी (२ जून) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर त्यांच्याबरोबर एकूण आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु या शपथविधीला त्या आठ आमदारांव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकारीदेखील उपस्थित होते. अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीच्या एकूण आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदार असल्याचं बोललं जात होतं. परंतु नेमके किती आमदार त्यांच्याबरोबर आहेत हे अद्याप कोणीही स्पष्ट केलेलं नाही.
अजित पवारांबरोबर शपथविधीला जे आमदार होते, त्यांना शरद पवार यांनी स्वतः फोन करून परत बोलावलं आहे. तसेच हे आमदार परत येतील असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले विधानसभेचे आमदार किरण लहामटे यांनी माहिती दिली आहे. किरण लहामटे हेदेखील अजित पवारांच्या शपथविधीला हजर होते. परंतु आता ते तटस्थ असल्याचं त्यांनी सांगितलं. किरण लहामटे यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली.
आमदार किरण लहामटे म्हणाले, “सायंकाळी सहा वाजता मला शरद पवार यांचा फोन आला. ते मला म्हणाले, तुम्हाला परत फिरावं लागेल. मी त्यांना म्हटलं, मी आता मतदार संघात जातोय. कारण शेवटी जनता जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल”. अजित पवार यांनी रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शपथ घेतली. यावेळी आमदार किरण लहामटे तिथे हजर होते.
हे ही वाचा >> “सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत सत्तेत जायचं ठरलं”, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
आमदार किरण लहामटे म्हणाले, शरद पवार यांनी आम्हाला परत फिरा असं आवाहन केलं आहे. परत फिरा एवढंच ते म्हणाले, कारण त्या दिवशी तेही व्यस्त असतील. त्यांना सगळ्या आमदारांशी बोलायचं असेल. आम्हाला शरद पवार साहेबांबद्दल आदर आहे आणि हा आदर उद्याही असेल, त्यात काही दुमत नाही. ते आमचं दैवत आहेत.