अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी बंडखोरी करत भाजपा-शिवसेनेने (शिंदे गट) स्थापन केलेल्या सरकारमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या एकूण ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीवेळी अजित पवार आणि त्या आठ आमदारांसह पक्षातील अनेक नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे अकोले विधानसभेचे आमदार किरण लहामटेही उपस्थित होते. त्यामुळे सुरुवातीला ते अजित पवार गटात असल्याचं बोललं जात होतं. परंतु आता ते तटस्थ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, काही वेळापूर्वी किरण लहामटे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. तेव्हाही त्यांनी त्यांची नेमकी भूमिका (ते कोणत्या गटात आहेत) स्पष्ट केली नाही. टीव्ही ९ मराठीशी बोलताना आमदार किरण लहामटे म्हणाले, अजित पवार यांनी आम्हाला भेटायला बोलावलं होतं, म्हणून मी तिथे गेलो होतो. आम्हाला वाटलं की, कदाचित पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नेत्याची निवड होणार असेल, म्हणून आम्ही तिकडे गेलो. परंतु त्याआधी दादांनी सव्वाच्या (दुपारी १.१५) दरम्यान शपथविधी सोहळ्याची कल्पना दिली. त्यांनी सांगितलं की, आपण अशी (भाजपाबरोबर जाण्याची) भूमिका घेत आहोत.
किरण लहामटे म्हणाले, त्या बैठकीवेळी (सत्तेत सहभागी होण्यापूर्वी अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेली बैठक) तिथे पक्षातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नेते उपस्थित होते. त्यात दिलीप वळसे पाटील असतील, नरहरी झिरवाळ असतील आणि प्रफुल पटेल असतील. या सगळ्या ज्येष्ठ मंडळींकडे बघून आम्हाला असं वाटलं की, हा निर्णय कदाचित पवार साहेबांचाच असेल. मी तिथे सुरज कडलग यांना विचारलं तर मला समजलं की या सगळ्याला पवार साहेबांची मूकसंमती आहे, त्यामुळे मी तिकडे (शपथविधीला) गेलो. परंतु नंतर समजलं की, याला शरद पवार यांची संमती नाही. त्यांनी सायंकाळी सहा वाजता फोन करून आम्हाला परत फिरा असंही सांगितलं.
हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव; केली ‘ही’ मोठी मागणी
त्या बैठकीवेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या : आमदार सुनील शेळके
किरण लहामटे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. आमदार सुनील शेळके काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांना म्हणाले, सत्तेत सहभागी होण्यापूर्वी शरद पवार साहेबांना विचारायला आम्ही जावं, असंही आम्हाला वाटत होतं. परंतु तिथे (सत्तेत जाण्याचा निर्णय झाला त्या चर्चेवेळी) सुप्रिया ताईसुद्धा होत्या. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे सर्व वरिष्ठ नेतेही तिथे हजर होते. या सर्वांनीच जर हा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय योग्यच असेल, असं आम्हाला वाटतं.