Manikrao Kokate On Ajit Pawar : राज्यात विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जोरादार तयारी सुरु केली आहे. अनेक नेत्यांकडून मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू आहे. एकीकडे महायुतीच्या नेत्यांच्या सभा आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मेळावे सुरु आहेत. या मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली जात असून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यातच गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु आहेत. मात्र, असं असतानाच आता सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांना मोठी ऑफर दिली आहे. ‘अजित पवारांनी विधानसभेची निवडणूक सिन्नरमधून लढवावी’, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. आज सिन्नरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा पार पडला, या मेळाव्यात ते बोलत होते.

हेही वाचा : Maharashtra Elections 2024: सोलापूरमध्ये अजित पवारांसमोर मोठे आव्हान

माणिकराव कोकाटे काय म्हणाले?

“दादा (अजित पवार) माझी तुम्हाला ऑफर आहे. या मतदारसंघातील सर्व जनतेसमोर सांगतो. मला या तालुक्याने खूप काही दिलं. आता आमची सर्वांची इच्छा आहे की, या मतदारसंघातील राहिलेले प्रश्न तुमच्या हातामधून सुटावे. त्यासाठी तुम्ही सिन्नरमध्ये येवून या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवा. आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करत आहोत. आम्ही तुम्हाला दीड लाख मतांच्या लीडने निवडून देऊ. एक जरी मत कमी पडलं तरी मी मुंबईतील मंत्रालयाची पायरी चढणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला या सिन्नरमधून निवडणूक लढवण्याची ऑफर करतो. मला माझ्या राजकारणात तुम्ही खूप काही दिलं. मला या सिन्नरचं बारामती करायचं आहे. मग बारामतीचा व्यक्ती जर सिन्नरमधून उभा राहिला तर सिन्नरचा विकास झपाट्याने झाल्याशिवाय राहणार नाही”, असं मोठं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं.

अजित पवार काय म्हणाले?

“माणिकराव कोकाटे यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांनी मला सिन्नरमधून निवडणूक लढवण्यासाठी विचारलं. आता अनेक ठिकाणी लोक मला विचारत असतात. आता परवा बारामती करांनी माझी गाडीच आडवली. ते म्हणाले की आज तुम्हाला आम्ही जाऊन देणार नाहीत. शेवटी बारामती माझी आहे आणि मी बारामतीचा आहे. तुम्ही माणिकराव कोकाटे यांनाच चांगलं मताधिक्य द्या. फार तर आपण स्पर्धा करू की सिन्नरमधला उमेदवार जास्त मतांनी निवडून येतो की बारामतीचा उमेदवार जास्त मतांनी निवडून येतो”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla manikrao kokate on ajit pawar sinnar assembly constituency vidhan sabha election 2024 gkt