बीड: ‘पाच वर्षांपूर्वी मला ईडी कळत नव्हती. आता मात्र बँकेत खाते नसले तरी त्यांच्या मागे ईडीची कारवाई लागत आहे असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. सध्याचे राजकारण  सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जात आहेत. निवडणुका लागल्यावर मी बँकेत खाते उघडले असेही आमदार लंके मिश्किलपणे म्हणाले. 

बीड जिल्ह्यातील कडा (ता.आष्टी) येथे रविवारी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी महोत्सव पार पडला. यावेळी आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आमदार लंके म्हणाले, आजबे यांनी मतदारसंघातील विकासासाठी सभागृहात सातत्याने आवाज उठवला. आज सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी महोत्सवाचे आयोजन करून त्याच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार प्राप्त होत आहे. हे काम आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे आहे, अशाचप्रकारची सामाजिक बांधिलकी लोकप्रतिनिधींनी जपली पाहिजे, असे ते म्हणाले.  कोणत्या कामाला विरोध करावा याचेच भान नसेल तर राजकारण कुठल्या टोकाला जात आहे हे दिसून येत आहे. हा समाजोपयोगी कार्यक्रम होऊ नये यासाठी काही विघ्नसंतोषी लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आजबे यांनी या वेळी  केला. या नोकरी मेळाव्यात ६५ कंपन्यांच्या प्रतिनिधींना पाचारण करण्यात आले होते. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची यावेळी उपस्थित होती.

Story img Loader