राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटानं अजित पवारांच्या नेतृत्वाखाली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला आहे. रविवारी घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे राज्याच्या रादकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या सर्व ९ जणांविरोधात अपात्रतेची कारवाई पक्षाकडून सुरू करण्यात आली आहे. शरद पवारांनी कोर्टात न जाता जनतेमध्ये जाऊन पुन्हा नव्याने पक्ष उभारणी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रचंड संदिग्धता निर्माण झालेली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून सूचक ट्वीट करण्यात आलं आहे.
शरद पवार आजपासून महाराष्ट्राच्या विविध भागांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. कराडपासून या दौऱ्याला सुरुवात होत असून ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचं जल्लोषात स्वागत केलं आहे. तसेच, आम्ही तुमच्यासोबतच आहोत, असंही हे सर्वजण शरद पवारांना सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची ‘डील’ झाल्याचा दावा केला आहे. त्याामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केलेल्या ट्वीटमुळे नवी चर्चा सुरू झाली आहे.
काय आहे या ट्वीटमध्ये?
अजित पवार व त्यांच्यासह एकूण ९ आमदारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अपात्रतेच्या कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात नीलेश लंकेंनी केलेल्या ट्वीटमुळे नव्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. “येत्या दोन दिवसांत सर्वांना अपेक्षित असा निर्णय होईल, अशी मी अपेक्षा बाळगतो!” असं या ट्वीटमध्ये नीलेश लंकेंनी नमूद केलं आहे.
“अजित पवारांनी तीन वेळा प्रयत्न केले”, संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, “मी ऑन कॅमेरा सांगतो की…!”
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब असून शरद पवार, अजित पवार व सुप्रियाताई सुळे हे आमचे नेते व कुटुंब प्रमुख आहेत. या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे. सध्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र राहावे अशी माझी भूमिका आहे. तरी येणाऱ्या दोन दिवसात सर्वांना अपेक्षित असा निर्णय होईल अशी मी अपेक्षा बाळगतो!” असं या ट्वीटमध्ये नीलेश लंकेंनी म्हटलं आहे.
२०१९ मध्ये जेव्हा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसमवेत शपथविधी केला होता, तेव्हा ८० तासांत ते सरकार कोसळलं होतं आणि अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीकडे परतले होते. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे!