राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपा आमदार राम सातपुते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “हिंदुत्वाच्या आडून सुपाऱ्या घेऊन अधिकाऱ्यांवर दडपशाही करणं हा आमचा स्वभाव नाही. त्यामुळे मला भाजपा आमदार राम सातपुतेंनी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही,” असं मत प्राजक्त सातपुतेंनी व्यक्त केलं. ते शनिवारी (२४ डिसेंबर) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
प्राजक्त तनपुरे म्हणाले, “भाजपा आमदार राम सातपुतेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्वाच्या आडून सुपाऱ्या घेऊन अधिकाऱ्यांवर दडपशाही करणं हा आमचा स्वभाव नाही. आम्हीही खरे हिंदू आहोत आणि सर्वसामान्य जनतेत्या विकासासाठी वेळ देतो. कोणाच्यातरी सांगण्यावरून दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यावर दबाव टाकणे आणि हिंदुत्वाच्या आडून अश्लील आणि फालतू कामं आम्ही कधीही करत नाहीत. त्यामुळे मला कोणीही हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही.”
“मला जनतेने २५ हजार मतांच्या फरकाने निवडून दिलं”
“मला माझ्या मतदारसंघातील जनतेने २५ हजार मतांच्या फरकाने निवडून दिलं आहे. मी सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन सर्वांना न्याय देण्याचं काम करतो,” असं म्हणत प्राजक्त तनपुरेंनी राम सातपुतेंना टोला लगावला.
“धर्मांतराच्या आडून चांगल्या अधिकाऱ्यावर दडपण आणण्याला विरोध”
प्राजक्त तनपुरे पुढे म्हणाले, “आमच्या मोर्चाचा आणि धर्मांतराचा कोणताही संबंध नव्हता. जर चुकीच्या पद्धतीने धर्मांतर होत असेल, तर त्याचं आम्ही समर्थन करत नाही, हे सकाळीच मी सांगितलं होतं. मात्र, धर्मांतराच्या आडून एका चांगल्या अधिकाऱ्यावर दडपण आणलं जात असेल, तर त्याला आमचा विरोध आहे.”
“दबाव आणणाऱ्यांचा बोलवता धनी नगर जिल्ह्यातील आहे का?”
“दबाव आणणाऱ्यांचा बोलवता धनी नगर जिल्ह्यातील कोणी आहे का? हिंदुत्वाच्या आड कोणी एका चांगल्या अधिकाऱ्याचा बळी घेणार असाल, तर ते आम्हाला कदापि मान्य नाही,” असा इशाराही प्राजक्त तनपुरेंनी दिला.