लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आलं. मात्र, महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. महायुतीला कमी जागा मिळाल्यामुळे महायुतील मोठा धक्का बसला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला लोकसभेला फक्त एक जागा मिळाली. यावर भाष्य करत आमदार रोहित पवार यांनी एक मोठं विधान केलं होतं. “अजित पवार गटाचे १५ ते १६ आमदार आमच्या संपर्कात आहेत”, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं.

त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मोठा दावा केला आहे. “रोहित पवार हे स्वत: भाजपामध्ये जाऊन मंत्रीपद मिळवण्यासाठी उत्सुक असून त्यासाठी त्यांनी भेटीगाठीही घेतल्या आहेत”, असं मोठं विधान प्रकाश सोळंके यांनी आज केलं. याचवेळी त्यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवावरही भाष्य केलं आहे. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा : लोकसभेला महाराष्ट्रात भाजपाला कशाचा फटका बसला? रावसाहेब दानवे म्हणाले, “राजकीय वातावरणात…”

आमदार प्रकाश सोळंके काय म्हणाले?

“भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला हे दुर्देव आहे. बीडच्या जनतेने त्यांना निसटता पराभव दिला, त्यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाची संधी गेली आहे, असे माझे मत आहे. पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या तर त्यांना निश्चत केंद्रात मंत्रिपद मिळालं असतं. त्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या निकासाला गती मिळाली असती. पण ही संधी बीड जिल्ह्यातील जनतेनं घालवली आहे”, असं आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटलं.

ते पुढं म्हणाले, “भारतीय जनता पक्षाने एक प्रभावी नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं पाहिजे. त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं तर बीड जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच हातभार लागेल, अशी आमची मित्रपक्ष म्हणून भावना आहे. मात्र, हा भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे यावर अधिक बोलणं योग्य ठरणार नाही”, असं मत आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केलं.

प्रकाश सोळंके रोहित पवारांबाबत काय म्हणाले?

आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे १५ ते १६ आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. या प्रश्नाचं उत्तर देताना प्रकाश सोळंके म्हणाले, “हा सर्व प्रचाराचा एक भाग आहे. आमची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. कोणीही अजित पवार यांना सोडून त्यांच्याकडे जाणार नाही. उलट माझी अशी माहिती आहे की, रोहित पवार स्वत: भाजपामध्ये जाऊन मंत्रिपद मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी अनेकदा भेटीगाठीही घेतल्या आहेत. त्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा देखील सुरु आहेत”, असा मोठा दावा आमदार प्रकाश सोळंके यांनी केला.