राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सध्या चर्चेत आहे. याच यात्रे दरम्यान काय काय अनुभव आले? ते X या सोशल मीडिया हँडलवरुन रोहित पवार पोस्ट करत असतात. अशातच काही वेळापूर्वी त्यांनी जी पोस्ट केली आहे त्यावरुन चर्चा सुरु झाली आहे. तसंच त्यांचा हा अंगुली निर्देश देवेंद्र फडणवीसांकडे आहे का? याबाबतही बोललं जातं आहे.
काय म्हटलं आहे रोहित पवार यांनी?
युवा संघर्ष यात्रेत साडेचारशे किमी पायी चालल्यानंतर एक गोष्टी जाणवली ती म्हणजे पूर्वीच्या काळात मराठेशाही एका अनाजी पंतने संपवली. आत्ताच्या काळात ‘महाराष्ट्र धर्म’ संपवण्याचे काम एक आधुनिक ‘अनाजी पंत’ करत आहेत. रोहित पवार यांनी ही पोस्ट केल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहण्यास मिळत आहेत. काही युजर्स रोहित पवारांची बाजू घेत आहेत. तर काही युजर्स हे रोहित पवार जातीचं राजकारण करत असल्याचं म्हणत आहेत.
देवेंद्र फडणवीसांकडे अंगुली निर्देश?
फेब्रुवारी महिन्यात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख अनाजी पंत असा केला होता आणि मोहीत कंबोजने केलेले आरोप फेटाळले होते. आता रोहित पवार यांनीही आधुनिक अनाजी पंत असा उल्लेख आपल्या पोस्टमध्ये केला आहे. त्यावरुन पुन्हा एकदा भास्कर जाधव यांनी केलेल्या उल्लेखाची अनेकांना आठवण झाली आहे. त्यामुळे रोहित पवारांचा अंगुलीनिर्देश देवेंद्र फडणवीसांकडे आहे अशी चर्चा होते आहे. आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव थेटपणे घेतलेलं नाही.
अनाजी पंतांचा उल्लेख छत्रपती शिवरायांच्या इतिहासात आढळतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांना बंदी बनवण्याचा घाट अनाजी पंतांनी घातल्याचे इतिहासात म्हटले आहे. त्यामुळे संभाजी महाराजांनी अनाजी पंतांना हत्तीच्या पायी दिल्याचं इतिहासकार म्हणतात. त्याप्रमाणेच २०१४ आणि खासकरुन २०१९ नंतर राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षांकडून आणि ट्रोलर्सकडून देवेंद्र फडणवीस यांचा अनाजी पंत असा उल्लेख केला जात होता. आता पुन्हा एकदा रोहित पवारांनी तो उल्लेख केल्याने या चर्चा सुरु झाल्या आहेत.