Rohit Pawar Criticized Chhagan Bhujbal: आमदारांना बैठकीला बोलावलं गेलं. त्यानंतर सह्या घेतल्या गेल्या. अजित पवारांविषयी मी फार बोलणार नाही. पण मला प्रश्न आहे तो बाकीच्या नेत्यांचा आहे. बाकीचे नेते का गेले? राज्यात १५ वर्षे सत्ता होती तेव्हा यातल्या नेत्यांना पदं देण्यात आली होती तरीही ते का गेले? हा प्रश्न मला पडला आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
कुणावरही अन्याय झाला नाही
अजित पवार यांच्यासह जे गेले आहेत त्यांना मंत्रिपदं दिली गेली, इतर शक्य त्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. कुणावरही अन्याय झाला नाही. अशा परिस्थितीत हा निर्णय घेतला गेला. भाजपा काहीतरी करणार याचा अंदाज आम्हालाच काय जनतेलाही होता. कारण महाराष्ट्रात असणारे दोन पक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष मराठी अस्मितेला धरुन होते. महाराष्ट्रासाठी काहीतरी करायचं या उद्देशाने या दोन्ही पक्षांची स्थापना झाली. भाजपाने हे दोन पक्षच फोडले.
भाजपाला मराठी अस्मिता फोडायची होती का?
भाजपाने जी फोडाफोडी केली त्यात त्यांना पक्ष फोडायचा होता की मराठी अस्मिता फोडायची होती? की आम्ही काहीही करु शकतो हे मराठी माणसांना दाखवायचं होतं ? असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी tv9 मराठीशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे प्रश्न विचारले आहेत. एवढंच नाही तर उद्या (५ जुलैला) तुम्हाला समजेलच कुणाकडे किती आमदार आहेत?
उद्या अजित पवार यांनीही बैठक बोलवली आहे आणि शरद पवार यांनीही त्यावर विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “एक बैठक यशवंतराव चव्हाण नावाने जी वास्तू आहे तिथे आहे. तर सगळे आमदार, खासदार आणि पदाधिकारी येतील. सगळ्यांना बोलवलं गेलं आहे. दुसरी बैठक भुजबळ सिटी म्हणून काहीतरी ठिकाण आहे. तिथे आहे, नावातच काहीतरी फरक आहे. त्यामुळे लोक पुरोगामी विचार, महाराष्ट्राचा विचार ज्यांनी जपला म्हणजेच यशवंतराव चव्हाण यांच्याकडे पाहून आणि शरद पवारांचं काम हे पाहून येतील. ज्या लोकांना पदं दिली आणि ताकद दिली ते लोक त्यांना सोडून गेले आहेत. संघर्षाच्या काळात आपण आपल्या कुटुंबाबरोबर राहतो. हा संघर्ष विचारांचा आहे. त्यामुळे पवारसाहेब लढत आहेत” असंही रोहित पवार म्हणाले.