पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल (दि. १९ जानेवारी) मुंबईतील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. आज सकाळी ट्विट करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका जुन्या भूमिपूजन कार्यक्रमाची आठवण करुन दिली. तसेच काल मुंबईत झालेला कार्यक्रम हा, “प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय!”, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले ट्विटमध्ये
रोहित पवार यांनी आज सकाळी दोन ट्विट केले आहेत. त्यापैकी पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, “काल मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल!”
तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी भाजपावर बोचरी टीका केली आहे. “मात्र, २०१६ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारकाच्या भूमीपूजनासाठी आणलेल्या गड-किल्ल्यांवरील पवित्र मातीने नक्कीच मूक अश्रू ढाळले असतील आणि अरबी समुद्रातील त्या खडकानेही आश्चर्याने कान टवकारले असतील!” असा आशयाचे ट्विट करत अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले? असा सवालच रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा >> “काहींची इच्छा होती की, मोदीजींच्या हस्ते लोकार्पण होऊ नये; पण नियतीच्या…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मविआवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (१९ जानेवारी) मुंबईत महानगरपालिका, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि अन्य काही संस्थांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठीच्या नियोजनासाठी मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. मात्र यापैकी बहुतांश प्रकल्पांचे नियोजन हे शिवसेनेच्या कार्यकाळात झाले असल्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये श्रेयाची लढाई जुंपली आहे.
हे ही वाचा >> एकनाथ शिंदेंनी दिले मुंबई मनपासाठी नव्या युतीचे संकेत; म्हणाले, “डबल इंजिनला ट्रिपल इंजिनमध्ये…”
हे देखील वाचा >> विश्लेषण : शिवस्मारकाचे झाले काय? हा प्रकल्प अजूनही प्रलंबित का?
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आतंरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईतील अरबी समुद्रात बांधण्याची योजना आहे. हा प्रकल्प राज्य सरकारने २०१४पासून हाती घेतला असला तरी शिवस्मारकाची संकल्पना १९९६ मध्ये मांडली गेली. भाजप-शिवसेनेने २०१४ मध्ये शिवस्मारक बांधण्याचे आश्वासन दिले. हा प्रकल्प २०१५ मध्ये प्रत्यक्षात हाती घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ डिसेंबर २०१६ रोजी प्रकल्पाचे जलपूजन केले.