राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात विविध विषयांवर बोलत असताना प्रभू श्री राम हे वनवासात असताना मांसाहार करत होते, असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानानंतर आता राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित पवार गटाच्या वतीने आव्हाड यांच्या ठाण्यातील घराबाहेर राम आरती करण्याचा प्रयत्न केला. भाजपाच्या नेत्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचबरोबर शरद पवार गटाचे युवा आमदार रोहित पवार यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना त्यांना घरचा आहेर दिला आहे.
रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट टाकून याबाबत जितेंद्र आव्हाड यांना खोचक सल्ला दिला आहे. “आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे”, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले.
रोहित पवार पुढे म्हणतात, “देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!”
हे वाचा >> “श्रीराम मांसाहारी…”, जितेंद्र आव्हाडांच्या विधानानंतर अजित पवार गटाचे आंदोलन
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?
“राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील शिबिरात उपस्थित केला. तसेच शिबिरानंतर माध्यमांनी आव्हाड यांना पुन्हा एकदा या विषयावर बोलते केले. तेव्हा ते म्हणाले, “मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत”, असेही आव्हाड म्हणाले.