कर्जत-जामखेडमधील राम शिंदे विरुद्ध रोहित पवार हा राजकीय कलगीतुरा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा नाही. नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही त्याचा प्रभाव दिसून आला. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने पुन्हा एकदा हे दोन्ही नेते एकमेकांना भिडले आहेत. यंदा कर्जत-जामखेडऐवजी चौंडीमध्ये हे दोघे नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. चौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने या दोघांनी एकमेकांवर खोचक टीका केली आहे.

रोहित पवारांकडून चौंडीमध्ये कार्यक्रमांचं आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. तसेच, यानिमित्ताने रोहित पवार या भागात फिरताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते राम शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं राजकारण करू नये, असा अप्रत्यक्ष सल्ला रोहित पवारांना दिला. “अहिल्यादेवी होळकर यांचं चौंडी हे जन्मस्थळ आहे. कुणीही राजकीय गोष्टी केल्या तर त्याचा इथे उपयोग होणार नाही. इथे राजकारणाला वाव नाही”, असं राम शिंदे माध्यमांना म्हणाले.

“पवारांना राम शिंदेंपेक्षा जास्त राजकारण कळतं”

दरम्यान, यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना रोहित पवारांनी राम शिंदेंना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. “राजकारणाच्या बाबतीत मला वाटतं की पवारांना त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्यामुळे पवार कधीही सामाजिक कार्यक्रमात किंवा जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण करत नाहीत. ज्या ठिकाणी खरंच राजकारण करायला हवं, तिथेच पवार राजकारण करतात. राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणीही लागू नये”, असं रोहित पवार म्हणाले.

“आम्हाला विरोधी पक्ष न म्हणता देशभक्त म्हणा, कारण…”, संजय राऊतांचा पत्रकारांना अजब सल्ला, म्हणाले…

“आम्ही समाजकारण दाखवून देतोय, पण ते…”

“राजकारण कोण करतंय? कार्यकर्ता म्हणून इथे येणाऱ्या लोकांना सेवा मिळतेय की नाही हे आम्ही बघतोय. हे सगळं जयंती साजरी करण्याबाबतच्या प्रेमाचा प्रकार आहे. याला जर ते राजकारण म्हणत असतील, तर तो त्यांचा विषय आहे. त्यांना राजकारणाशिवाय दुसरं काही कळत नाही. आम्हाला समाजकारणाशिवाय काही कळत नाही. समाजकारण काय असतं हे आम्ही दाखवून देतोय. राजकारण काय असतं हे ते त्यांच्या वक्तव्यावरून दाखवून देतायत”, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.

Live Updates