गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चा सुरू असणारा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात दिल्लीत बोलावलेल्या विशेष बैठकीत संवाद साधला.या मुद्द्यावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा बेळगाव दौरा चर्चेत आला होता. त्यासंदर्भात मंत्री उदय सामंत आणि रोहित पवार यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.
नेमकं घडलं काय?
रोहित पवारांनी वादग्रस्त सीमाभागाचा दौरा करताना बेळगावमध्ये काही ठिकाणी भेटी दिल्या. या दौऱ्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी खोचक टिप्पणी केली होती. “लहान मुलांना आपण सांगतो की आपली अस्मिता आपण टिकवली पाहिजे. पण अशावेळी जर मोठे नेते उगाच बोलायचं म्हणून बोलत असतील तर हे लोकांना पटणार नाही. लोकांना हे पटत नाहीत, म्हणून हे सर्व लोक एकत्र येऊन या विचाराच्या विरोधात, शासनाती एवढे मोठे नेते चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत, त्याविरोधात १७ तारखेला मुंबईचा मोर्चा काढत आहेत”, असं रोहित पवार म्हणाले.
“मधल्या सहा दिवसांत पडद्यामागे बऱ्याच घडामोडी…”, अजित पवारांचं मोठं विधान; शिंदे सरकारवर हल्लाबोल!
दरम्यान, यावर प्रत्युत्तर देताना उदय सामंत यांनी रोहित पवारांना टोला लगावला होता. “कुठेतरी सत्यनारायणाच्या पूजेला जायचं असा दौरा असू शकत नाही. मला वाटतं की जाताना ताठ मानेनं मी तिथे येतोय असं सांगून जायला हवं. आम्ही तिकडे जाताना तसं सांगून जाऊ”, असं उदय सामंत म्हणाले.
“हा विषय आपल्या आवाक्याबाहेरचा”
यावरून आता पुन्हा एकदा आमदार रोहित पवार यांनी ट्विटर अकाऊंटवरून खोचक टोला लगावला आहे. “उदय सामंतसाहेब, किमान सत्यनारायणाचा उल्लेख करताना तरी सत्य बोला. तुम्ही माझे जुने मित्रच आहात. पण नव्या संगतीचा इतका लवकर परिणाम बरा नाही. मराठी अस्मितेशी संबंधित बेळगावविषयी आपणास विस्तृतपणे सांगितले असते. परंतु आपले वक्तव्य ऐकून हा विषय आपल्या आवाक्याबाहेरचा वाटतो. क्षमस्व!” असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.
दरम्यान, सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडून मध्यस्थी केली जात आहे.