मातृदिनाप्रमाणेच आपल्या वडिलांविषयी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी जगभरात १८ जून रोजी पितृदिन साजरा केला जातो. याच दिवसाचं निमित्त साधून आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी त्यांच्या फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आमदार रोहित पवार आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार यांच्यातल्या नात्याविषयी उल्लेख केला आहे. एरवी राजकीय वर्तुळामध्ये कायम आक्रमक, विरोधकांवर टीका करणारे किंवा राजकीय डावपेचांविषयी सूचक विधानं करणारी नेतेमंडळी देखील एक माणूसच असतात आणि अशा प्रसंगी त्यांच्या नातेसंबंधांमधून ते अधिकच खुलत असतं हेच सुनंदा पवार यांच्या फेसबुक पोस्टमधून दिसत आहे.
वडील आणि मुलाचं नातं कसं असतं?
सुनंदा पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये वडील आणि मुलाच्या नात्याविषयी भाष्य केलं आहे. “आज समाजात वडील व मुलगा यांचं नातं सहसा भिती, धाक या भावनांमध्ये दबलेलं असतं. मुलगा म्हणून वडिलांकडे काही हट्ट करायचे असतील तर ते आईच्या माध्यमातून करायचे असा समज मुलांमध्ये असतो. आजच्या युगात फार कमी कुटुंबात वडील व मुलगा यांचे नाते अतिशय मनमोकळे व मैत्रीपूर्ण असते. जन्मापासून अगदी वयात येईपर्यंत वडील म्हणून आपल्या मुलांचा विचार करणारे पालक फार कमी पाहायला मिळतात”, असं सुनंदा पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
“कॉलेजमधे असताना अथवा व्यवसाय, नोकरी करताना स्वतःच्या आवडी निवडी मुलांच्यावर न लादता मुलांना काय हवंय? काय झेपेल? हे जाणून त्यांच्या यश-अपयशात खंबीरपणे एक मित्र म्हणून पाठिशी उभं रहाणं हे वडिलांचं कर्तव्य असतं. यातून वडील व मूल हे नातं अधिक घट्ट होतं. मोकळेपणाचं रहातं. कितीही अडचणी आल्या तरी मुलं आपल्या वडिलांपासून कोणत्याही चुका, अडचणी, चुकीचे निर्णय लपवत नाहीत. उलट वडिलांबरोबर मनापासून शेअर करतात. मार्ग शोधतात आणि आपल्या हातून परत अशा चुका होणार नाहीत याची काळजी घेतात”, असं देखील त्यांनी नमूद केलं आहे.
रोहित पवारांचं वडिलांशी नातं कसं आहे?
“वडील आणि मुलगा म्हणून एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यात किती हस्तक्षेप करायचा हे ज्या नात्यांना कळतं ती नाती घट्ट व मनमोकळी राहातात. थोडक्यात पालकांना आपल्या मुलांशी जिवाभावाचा मित्र बनता आले पाहिजे. हेच नातं रोहित आणि राजेंद्र दादांनी जपलं आहे”, अशा शब्दांत सुनंदा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांचं त्यांच्या वडिलांसोबत असलेल्या नात्याविषयी भाष्य केलं आहे.