भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याच्या कारणातून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. तसेच आमच्या देव-देवतांचा होणारा अपमान आणि आमच्या लोकांवर होणारे हल्ले सहन करणार नाही. आमच्या लोकांच्या संरक्षणासाठी आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडावा लागेल, असा धमकीवजा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्वीट करत नितेश राणे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “भंडाऱ्यात अत्याचार झालेली महिला आज मृत्यूशी झुंज देतेय, परंतु याबाबत आवाज उठवायला ‘आमचं हिंदुत्व’ कधी जागृत होत नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘आमचा’ तिसरा डोळा कधी उघडत नाही. पण राजकीय पोळ्या शेकण्यासाठी मात्र आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका आहे” अशी टीका रोहित पवार यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट वेगानं व्हायरलं होतं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत याठिकाणी प्रतीक पवार नावाच्या तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याने झाल्याचा आरोप भाजपा नेते नितेश राणे यांनी केला आहे. आमच्या लोकांवर असेच हल्ले होत राहिले तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- “आधी स्वत:च्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग…” रावसाहेब दानवे यांची इम्तियाज जलील यांच्यावर बोचरी टीका!

यावेळी ते म्हणाले की, “मला आठवतंय काही आठवड्यांपूर्वी नाशिकमधील एका युवकाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्याने शिवलिंगाचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या घटनेनंतर आम्ही नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटलो होतो. आमच्या असंख्य देवी-देवतांच्या फोटोंची आणि मूर्तींची विटंबना केली जाते. पण आम्ही हिंदू म्हणून लोकशाही पद्धतीने आवाज उठवतो. कुणालाही मारून टाकण्याचे प्रकार महाराष्ट्राने आतापर्यंत ऐकलेत का? तुम्ही तुमच्या देवतांचा झालेला अवमान विसरायला तयार नसाल, तर आम्ही विसरण्याची भूमिका का घ्यावी? शिवलिंगावर तुम्ही घाणेरडे प्रकार कराल, आमच्या लोकांना मारण्यापर्यंत तुमची हिंमत जात असेल, तर आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी तिसरा डोळा उघडावा लागेल” असं नितेश राणे म्हणाले.

Story img Loader