Rohit Pawar On Kedar Jadhav : भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवने आज (८ एप्रिल) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केदार जाधवचा भाजपात अधिकृत प्रवेश झाला. केदार जाधव क्रिकेटच्या मैदानानंतर आता थेट राजकारणाच्या आखाड्यात उतरल्यामुळे चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केदार जाधवच्या भाजपा प्रवेशावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘योग्य संघाची निवड केली असती तर अधिक आनंद वाटला असता’, असं म्हणत रोहित पवारांनी केदार जाधवला भाजपा प्रवेशाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रोहित पवारांनी काय म्हटलं?
“क्रिकेटच्या मैदानातील इनिंगनंतर माझे मित्र आणि #teamIndia चे माजी खेळाडू केदार जाधव नवीन इनिंगसाठी राजकारणाच्या मैदानात उतरत आहेत. त्यांनी योग्य संघाची निवड केली असती तर अधिक आनंद वाटला असता. पण असो! या मैदानावरही ते धुवांधार बॅटिंग करतील, असा विश्वास आहे, त्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा”, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
क्रिकेटच्या मैदानातील इनिंगनंतर माझे मित्र आणि #teamIndia चे माजी खेळाडू केदार जाधव नवीन इनिंगसाठी राजकारणाच्या मैदानात उतरत आहेत. त्यांनी योग्य संघाची निवड केली असती तर अधिक आनंद वाटला असता.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 8, 2025
पण असो! या मैदानावरही ते धुवांधार बॅटिंग करतील, असा विश्वास आहे, त्यासाठी त्यांना… pic.twitter.com/97VjzVNruE
भाजपा प्रवेशांनंतर केदार जाधव काय म्हणाला?
“नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचं काम पाहून मला खूप प्रेरणा मिळते. त्यामुळेच मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. माझं आता एकच ध्येय आहे, देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रगतीसाठी जे काही करता येईल ते सगळं मला करायचं आहे. या प्रगतीसाठी नेतृत्व खूप महत्त्वाचं आहे. माझ्यासारखे तरुण अशा एखाद्या नेतृत्वाच्या पाठी उभे राहतात. राज्याची व देशाची सेवा करण्यालायक बनतात. आपल्याकडे नरेंद्र मोदींच्या रुपात ते नेतृत्व आहे. महाराष्ट्राकडे देवेंद्र फडणवीस आहेत”, असं केदार जाधवने म्हटलं.
केदार जाधवची मोदी व फडणवीसांवर स्तुतीसुमने
“२०१४ ला केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं, तेव्हापासून त्यांना देशातील नागरिकांकडून ज्या पद्धतीचं प्रेम मिळालं, त्यांना जनतेचं जितकं समर्थन मिळालं आहे, त्या समर्थनाच्या जोरावर त्यांनी देशाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. गेल्या कित्येक वर्षांत कुठल्याही सरकारला जे जमलं नाही ते नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षांत करून दाखवलं आहे. नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत देशाचा खूप विकास केला. आता आपण विकसित भारताच्या दिशेने जात आहोत. मोदीनी जसा देशाचा विकास केला तसाच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विकास केला. त्यांनी देखील अनेक मोठी कामं केली आहेत”, असं केदार जाधवने भाजपात प्रवेश केल्यानंतर म्हटलं.