गोवा विधानभा निवडणुकीमध्ये भाजपानं सत्तास्थापनेच्या दिशेनं वाटचाल केली आहे. काँग्रेस सत्तेच्या रेसमध्ये पिछाडीवर पडल्यामुळे गोव्यात भाजपाचीच सत्ता येणार, हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या जल्लोषाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत कदाचित वेगळं चित्र दिसू शकलं असतं, असं आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
गोव्यात भाजपानं १९ जागांपर्यंत मजल मारली असून काँग्रेस १२ जागांपर्यंतच अडकली आहे. काही अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे गोव्यात भाजपा सत्तास्थापनेचा दावा सादर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला सत्तेबाहेरच राहावं लागणार आहे. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली होती, तर काँग्रेसनं स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली होती.
गोव्यातील परिस्थितीविषयी बोलताना रोहीत पवार यांनी एकत्र न लढल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. “गोवा हे एक छोटं राज्य आहे. त्यात आमदारकीचं मतदान फार कमी आहे. एकत्रित लढण्याची ताकद खूप मोठी आहे. तसं तिथे लढलो असतो, तर चित्र वेगळं दिसलं असतं”, असं रोहीत पवार म्हणाले आहेत.
“महाराष्ट्रातल्या नेत्यांना खूश व्हायचं कारण काय?”
“भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं असं असावं, की उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला एकहाती सत्ता मिळेल. ती जरी मिळाली, तरी महाराष्ट्रातल्या नेत्यांना खूश होण्याचं कारण काय? आता तुम्ही महाराष्ट्राच्या हिताविषयी विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही सत्तेत होता, तेव्हा महाराष्ट्राची ताकद तुम्ही कमी करत होता”, असं देखील रोहीत पवार म्हणाले.
महाराष्ट्रात सत्ताबदल होईल?
“यूपीमध्ये जे काही झालं, त्यावरून महाराष्ट्रात देखील बदल होईल या गोष्टी जर यांच्या डोक्यात असतील, तर ते चुकीचं आहे. महाराष्ट्र हे देशाला मार्ग दाखवणारं राज्य आहे. अशी तुलना करणं योग्य नाही”, अशा शब्दांत आमदार रोहीत पवार यांनी महाराष्ट्रात सत्ताबदलाची शक्यता फेटाळून लावली आहे.