इंदापूरमधील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आल्याची घटना समोर आली. तर काही दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्थानकातच गोळीबार केल्याची घटना घडली होती. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना वाढल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. “भाजपा महाराष्ट्राला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बरोबरीने घेऊन जात आहे”, अशी टीका त्यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“विकासाच्या बाबतीत आपण देशात मागे आहोत. पण गुन्हेगारीमध्ये आपण पुढे गेलो आहोत. अशी परिस्थिती याआधी नव्हती. महाराष्ट्रात दिवसाढवळ्या खून होत असतील आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुंडांकडून सत्कार स्वीकारत असतील, गुंड मंत्रालयात रील करत असतील तर या गुंडांना कशाचीही भिती राहिली नाही, हेच यावरून दिसते. जेव्हा भिती नसते तेव्हा दिवसाढवळ्या बंदूक बाळगणे, गोळ्या घालणे, असे प्रकार वाढतात. या सर्व गोष्टींकडे पाहताना भाजपा महाराष्ट्राला कुठे घेऊन जात आहे हे दिसते”, असे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेत बोलताना आपण मोक्का कारवाईतून एकाला वाचवल्याची कबुली दिली होती. आता यावरूनच रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले, “काही लोक मोक्का कारवाई रद्द करतात. मात्र, या गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या नाहीत. जेव्हा लोकांना अडचणी येतात तेव्हा पोलीस त्यांचे ऐकत नाहीत, अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे”, असे ते म्हणाले.

हेही वाचा : शरद पवार गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

आघाडीचे उमेदवार कधी जाहीर होणार?

महाविकास आघाडीचे उमेदवार कधी जाहीर होणार, याबाबतही रोहित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “सर्व लोक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत. तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उर्जा आहे. जसे उमेदवार जाहीर होतील तसे भाजपाच्या विरोधातील वातावरण आणखी तापेल. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये कुणाला किती जागा दिल्या जातील, यावर चर्चा पूर्ण झाली आहे. आता फक्त उमेदवार जाहीर होणं बाकी आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत सर्वच उमेदवार जाहीर झालेले असतील”, असे रोहित पवार यांनी सांगितले.

एकनाथ खडसेंनी रावेरमधून माघार का घेतली?

रावेर मतदारसंघातून लोकसभा लढवण्यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. यासंदर्भात रोहित पवार म्हणाले, “एकनाथ खडसे मोठे नेते आहेत. पण त्यांना आरोग्याची अडचण आहे. भाजपाच्या काळात ते सत्तेत असतानादेखील त्यांच्यावर खोटे आरोप झाले होते. ज्या व्यक्तीने भाजपाला वाढवले अशा व्यक्तीला जर त्यांच्याच पक्षाने अडचणीत आणलं जातं तेव्हा माणूस भावनिक होतो. मग आरोग्याचा त्रास वाढत जातो. आज त्यांच्या आरोग्याची परिस्थिती नाजूक आहे. पण तरीही भाजपाच्या विरोधात लढण्यासाठी ते तयार आहेत. पण त्यांना डॉक्टर परवानगी देत नाहीत. त्यामुळे लवकरच तेथील उमेदवार जाहीर होईल”, असे रोहित पवार म्हणाले.

नेत्यांना दिल्लीवारी का करावी लागते?

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे अर्थातच घडामोडी वाढल्या आहेत. यातच महाराष्ट्रातील काही नेत्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. याचसंदर्भात रोहित पवार म्हणाले, “खरे तर महाराष्ट्राच्या जनतेला या गोष्टींची चीड येते. महाराष्ट्र देशातील सर्वात विकसित राज्य आहे. आधीपासून महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही. मात्र, काही नेते नेहमी दिल्लीत जातात, मागण्या करतात. पण त्यांच्या मागण्या ऐकल्या जात नाहीत. असे असतानाही महाराष्ट्राच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन झुकणे किती योग्य आहे? हा प्रश्न सामान्य लोकांना पडत आहे. या दिल्ली वाऱ्या सामान्य लोकांना आवडत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील”, असेही रोहित पवार म्हणाले.

“राज ठाकरे यांनी पुनर्विचार करावा”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून मनसे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. यावर रोहित पवार म्हणाले, “मराठी अस्मिता टिकावी, यासाठी राज ठाकरे यांनी मोठा लढा दिला. त्यांची २०१९ ची भाषणे आपण पाहिली तर भाजपाच्या विरोधात होती. बेरोजगारी हा मुद्दा घेऊन सामान्यांच्या बाजूने ते होते. पण राज ठाकरे यांच्यासारखा मोठा नेता दिल्लीत जात असेल आणि दिल्लीसमोर झुकत असेल तर हे लोकांना आवडणार नाही. त्याबाबतीत त्यांनी पुनर्विचार करावा, असे त्यांचेच कार्यकर्ते बोलत आहेत”, असे रोहित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla rohit pawar on maharashtra crime and bjp politics lok sabha election 2024 rno news gkt