Gram Panchayat Nivadnuk Nikal: राज्यतल्या २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज समोर येत असून त्यात सत्ताधाऱ्यांनी वर्चस्व मिळवल्याचं दिसत आहे. सत्ताधारी भाजपा, शिंदे गट व अजित पवार गटाने मिळून मोठ्या संख्येनं ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांसाठी हा धक्का मानला जात असताना त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचातय निवडणूक निकालांवरून राज्य स्तरावर कुणाचं वर्चस्व आहे, हे सिद्ध होत नसतं, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
आमदार रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “ग्रामपंचायत निकालांवरून कुणाचंही वर्चस्व आहे हे सिद्ध होत नसतं. लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील तेव्हाच यासंदर्भात गोष्टी स्पष्ट होतील. एखाद्या तालुक्यात एखादा नेता फारच चांगला असेल आणि तो सत्तेत असेल तर काही ठिकाणी ग्रामपंचायतीत कुणी, किती आणि कुठल्या बाजूला मतदान केलं याचाही काही प्रमाणात अंदाज लागतो. त्यामुळे काही लोकांनी भीतीपोटी मतदान केलं असेल किंवा काही ग्रामपंचायतींमध्ये पैशाचा वापर झाल्याचा मुद्दाही असेल. ग्रामपंचायतीत आपल्याला पक्षाबद्दलचा अंदाज येत नसतो”, असं रोहित पवार म्हणाले.
“कदाचित सत्ताधाऱ्यांना अंदाज नसेल की…”
“ग्रामपंचायतींच्या बाबतीत आपल्याला कोणताही दावा करता येत नाही. चिन्हं वेगळी असतात. गावपातळीवर जर खोलात गेलं तर २०-२० वर्षापूर्वीची भांडणंही त्या निवडणुकीत निघत असतात. अशा स्थितीत ग्रामपंचायतीतल्या निवडणुकीतले आकडे घेऊन उद्या काय होईल याचे ठोकताळे लावले जात असतील, तर सत्तेतल्या लोकांनी ते करावं. त्यात त्यांनी दिवाळीही साजरी करावी. पण लोकसभा व विधानसभेला काय होईल, याचा अंदाज कदाचित त्यांना नसेल”, असंही रोहित पवारांनी नमूद केलं.
“अजित पवारांनी असं काही केलं असेल असं वाटत नाही”
दरम्यान, काठेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अजित पवार गटाकडून पैशांचं वाटप केल्याचा आरोप भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला होता. हा दावा रोहित पवार यांनी फेटाळून लावला आहे. “आम्ही कधीही ग्रामपंचायत पातळीवरच्या निवडणुकीत लक्ष देत नसतो. ना अजित पवार, ना शरद पवार, ना मी, ना सुप्रिया सुळे. शेवटी तो कार्यकर्त्यांचा अंतर्गत विषय असतो. कार्यकर्ते आम्हाला येऊन एवढंच सांगतात की ‘हा आमच्या पातळीवरचा विषय आहे, तुमच्या निवडणुकीत आम्ही तुमच्याबरोबर असू. पण गावपातळीवर आमचे वाद वेगळे असतात. त्यामुळे तुम्ही यात लक्ष घालू नका’. त्यामुळे आम्ही कधीही ग्रामपंचायतीत लक्ष घातलं नाही. अजित पवारांनीही बारामतीत ग्रामपंचायतीत लक्ष घातलं असेल असं मला वाटत नाही”, असं ते म्हणाले.