मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा (३० ऑक्टोबर) सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी अन्न-पाण्याचा त्याग केल्याने त्यांची प्रकृती क्षणाक्षणाला खालावत असल्याचं दिसत आहे. यामुळे मराठा समाजासह त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली असून सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी विनंती केली आहे.
‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, “समाजासाठी प्रामाणिकपणे लढणारा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती क्षणाक्षणाला खालावत चालल्याने त्यांची सर्वांनाच चिंता वाटतेय. अशा परिस्थितीत सरकार नेमकी कशाची वाट बघतंय? सरकारला थोडीजरी काळजी असेल तर त्वरीत निर्णय घ्या आणि जरांगे पाटील यांची काळजी घ्या…”
हेही वाचा- मनोज जरांगेंची प्रकृती खालवल्यानंतर लेकीनं सांगितलं घरातलं दु:ख; म्हणाली, “मम्मी सतत रडतेय, आजोबाही…“
“दुर्दैवाने मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला काही धोका झाला तर खोटेपणाची आणि अहंकाराची गोळी खाऊन आपल्याच धुंदीत असलेल्या सरकारला जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळण्याची वेळ येईल. तशी वेळ येऊ देऊ नका, ही कळकळीची विनंती,” असंही रोहित पवार म्हणाले.
दुसरीकडे, मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक सुरू आहे. या बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते, कायदे तज्ज्ञ उपस्थित आहेत. या बैठकीनंतर दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.