राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी कामाला सुरुवात केली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विविध मतदारसंघात दौरे वाढवले आहेत. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांच्या जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहेत. त्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? किंवा कोणत्या पक्षाने किती जागांची मागणी केली, यावरून सध्या आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे.
असे असताना महायुतीमधील अजित पवार गटाने आपल्याला कमीत कमी ८० ते ९० जागा मिळाव्या, अशी मागणी काही नेत्यांनी मेळाव्यात बोलताना केली होती. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गट, शिंदे गट तसेच भाजपावर खोचक टीका केली आहे. तसेच अजित पवार गटाला महायुतीत विधानसभेला फक्त २० ते २२ जागा मिळतील, असा टोला लगावला आहे.
हेही वाचा : “खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन”, उद्धव ठाकरेंचा टोला; म्हणाले, “उद्या अधिवेशनात…”
रोहित पवार काय म्हणाले?
“महायुतीमध्ये विधानसभेला २०० जागा भारतीय जनता पार्टी लढेल. त्यांनतर ज्या ८८ जागा असतील त्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल किंवा अजून छोटे इतर पक्ष असतील. असंही बोललं जातं की, अजित पवार गटाला २० ते २२ जागा मिळतील. तसेच शिवसेना शिंदे गटाला ३० ते ३५ जागांच्या आसपास जागा मिळू शकतात. इतर मित्रपक्षांना काही जागा मिळतील. मात्र, भारतीय जनता पार्टी काहीही झालं, कोणी कितीही डोक फोडलं तरी २०० जागांच्या खाली लढणार नाही”, असा दावा रोहित पवार यांनी केला.
निलेश लंके मराठीतही बोलतील
निलेश लंके यांनी खासदारकीची शपथ इंग्रजीमधून घेतली. याबाबत रोहित पवार म्हणाले, “निलेश लंकेंनी खासदारकीची शपथ इंग्रजीमधून घेतली. आता नगरचे जे माजी खासदार आहेत, त्यांना एक प्रकारे उत्तर दिलं आहे. अशा पद्धतीने भाषेवर किंवा बोलण्याच्या पद्धतीवर तसेच शिक्षणावर कोणी कोणाला हिणवलं नाही पाहिजे. कामावर बोललं पाहिजे. निलेश लंके यांनी कोरोनाच्या काळात चांगलं काम केलं. लोकांनीही त्यांना खासदार केलं. त्यांना निवडून देताना लोकांनी सामान्य व्यक्तीकडे पाहिलं. निलेश लंकेंनी दिल्लीत जाऊन इंग्रजीमधून शपथ घेतली. ते आता उद्या जाऊन मराठीही बोलतील”, असा मिश्किल टोला रोहित पवार यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीसांना पदाचा विसर
पुण्यातील एफसी रोडवरील एका पबमध्ये काही तरूणांचा ड्रग्ज घेताला व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणानंतर पुण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या संदर्भात बोलताना रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “ड्रग्जचा वापर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचं कारण असं की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुटुंब फोडण्यात आणि पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना आपण गृहमंत्री आहोत हे त्यांना आठवत नाही किंवा ते विसरले आहेत”, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.