मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत हा निर्णय घ्यावा, असंही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं होतं. न्यायालयाने ११ मे २०२३ रोजी हा निर्णय दिला होता. हा निर्णय देऊन आता सात महिने उलटली आहेत, तरीही विधानसभा अध्यक्षांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.
१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष मुद्दाम विलंब करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान, राहुल नार्वेकर यांचे दिल्ली दौरेही वाढले आहेत. दिल्लीत जाऊन ते महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत मार्गदर्शन घेतात. भाजपाच्या वरिष्ठ नेत्याच्या सल्ल्यानुसारच वागतात, असा आरोपही त्यांच्यावर केला जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा- “सगळेच गद्दार, अजित पवार गट ‘खोके-खोके’ म्हणायचे, आता तेच…”, बच्चू कडूंचं मोठं विधान
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकशाहीच्या बाजूने निर्णय घेतला तर शिंदे गट अडचणीत येईल, असं सूचक वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. तसेच नार्वेकर सातत्याने दिल्लीत जाऊन चर्चा करतात आणि मार्गदर्शन घेतात, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांना आवडणारी नाही, कारण महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही, असं रोहित पवार म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- एकनाथ शिंदेंबरोबर कधीपर्यंत राहणार? बच्चू कडूंचे सूचक वक्तव्य
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, “मला एवढीच अपेक्षा आहे की, राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय संविधानाच्या बाजूने घ्यावा. नार्वेकरांनी हा निर्णय घेण्यास बराच उशीर केला आहे. त्यामुळे मला त्यांना फक्त एकच विनंती करायची आहे. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही आणि महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष सातत्याने दिल्लीला जाऊन चर्चा करत असतील आणि मार्गदर्शन घेत असतील, तर हे राज्यातील नागरिकांना आवडणारं नाही. ते लोकशाहीच्या बाजूने निर्णय घेणार असतील तर शिंदे गट अडचणीत येईल, असं मला वाटतं.”