रविवारी २ जुलै रोजी राष्ट्रवाजी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्याचं स्पष्ट झालं. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षातील ८ आमदारांनी सरकारला पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली. खुद्द अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. यामुळे शरद पवार गटाकडून आता अजित पवार गटाला लक्ष्य केलं जात आहे. शरद पवारांसोबत असणारे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांवर परखड शब्दांत सातत्याने टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये अजित पवारांसोबत गेलेल्या दिलीप वळसे-पाटील यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिलीप वळसे पाटलांची कारकीर्द

रोहित पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये दिलीप वळसे-पाटलांची कारकिर्द नमूद केली आहे. आधी शरद पवारांचे स्वीय सहायक, सात वेळा आमदार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, ऊर्जा मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, वित्त व नियोजन मंत्री, विधानसभा अध्यक्ष, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री, गृहमंत्री अशा विविध खात्यांचा कार्यभार शरद पवारांनी वळसे पाटलांना सोपवल्याचं रोहित पवारांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“शेवटी आलेल्यांना आधी जेवण मिळालं आणि आधी आलेल्यांना…”, बच्चू कडूंची अजित पवार गटावर नाराजी!

“अजून काय पाहिजे? शरद पवारांनी स्वत:च्या लेकराप्रमाणे जपलेला नेता म्हणून वळसे-पाटील साहेब तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तु्म्हीच तर होतात ज्यांच्यावर साहेब सर्वाधिक विश्वास ठेवायचे. हे सगळं वाचल्यावर लोक म्हणतील, असा अन्याय आमच्यावरपण व्हायला पाहिजे”, असं रोहित पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

“तुम्ही स्वत:ला माफ करू शकणार का?”

दरम्यान, आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवारांनी दिलीप वळसे-पाटलांना परखड सवाल केला आहे. “अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली, आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्यासारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती”, असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच. परंतु वळसे-पाटीलसाहेब, तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?” असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.