गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या राजकीय वर्तुळात २ ऑक्टोबरला एनसीबीनं केलेल्या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एनसीबीनं क्रूजवर केलेली कारवाई हा बनाव असल्याचा आरोप केला आहे. त्यासोबतच भाजपा नेत्यांमुळेच काही जणांना सोडून देण्यात आल्याचा दावा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. बारामतीमध्ये अजित पवारांसोबत रोहित पवार देखील दौऱ्यावर असून त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“मी त्यालाही ओळखत नाही आणि कुठल्या अभिनेत्यालाही ओळखत नाही. पण जर कारवाई होत असेल, तर सगळ्यांना समान न्याय असायला हवा. एनसीपीच्या कारवाईत काही भाजपाचे कार्यकर्ते होते. हे पाहाता काहीतरी चुकतंय का? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उभा राहतोय. त्याची उत्तरं दिलीच पाहिजे. कोणतीही कारवाई राजकीय हेतूने न होता योग्य पद्धतीने व्हावी”, असं रोहित पवार म्हणाले.
नितेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर
दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणेंनी ड्रग्ज प्रकरणावरून नवाब मलिक यांच्यावर आरोप केले आहेत. त्यावर देखील रोहित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “सुशांत सिंह असो वा आर्यन खान असो. ड्रग्जच्या बाबतीत कोणत्याही एजन्सीने हलगर्जीपणा करायला नको. मग ती राज्य सरकारची यंत्रणा असो वा केंद्र सरकारची यंत्रणा असो. नितेश राणेंना नेमकं काय म्हणायचं आहे ते मला कळत नाहीये. कारण ड्रग्ज हे घातकच असतं. पण नवाब मलिक जो मुद्दा मांडतायत, त्यात इतकंच म्हणणं आहे की कोणतीही व्यक्ती असली, तरी त्यात भेदभाव करू नये. एखाद्या व्यक्तीला पकडलं असेल किंवा कारवाई सुरू असेल, तर ज्यांना तुम्ही सोडलं आहे, त्यांना का सोडलंय? याचीही शहानिशा करायला हवी. जेव्हा एखाद्या बोटीवर १००-२०० पेक्षा जास्त मुलं-मुली असतात आणि ठराविक लोकांनाच पकडलं जात असेल, तर बाकीच्यांना का सोडलं? आपल्याला संदेश काय द्यायचाय?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
“आर्यन ‘खान’ असल्यामुळे त्याच्यासाठी नवाब मलिक भांडत असून सुशांत सिंह राजपूतसाठी ही तळमळ का दाखवली नाही?” अशी टीका आमदार नितेश राणेंनी केली आहे. त्याला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आयकर विभागाच्या छाप्यांवर रोहीत पवार म्हणतात…
दरम्यान, आयकर विभागाकडून आज सलग चौथ्या दिवशी देखील पवार कुटुंबीयांशी संबंधित कारखान्यांवर, कार्यालयांवर छापेमारी सुरू होती. त्यावर रोहीत पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आयकर विभाग कुणाच्याही घरी वा कारखान्यात येऊ शकतं. फक्त इतकंच म्हणणं आहे की कोणतीही कारवाई होताना त्यात राजकीय हेतू नसावा. उगीच त्रास द्यायचा म्हणून राजकीय हेतूने त्रास दिला जात असेल, तर ती चुकीची गोष्ट आहे. राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांच्या कुटुंबीयांनाही त्रास होत असेल, तर ती गोष्ट अशा नेत्यांना आवडत नसते. अजित दादाही हेच म्हणाले आहेत की कुटुंबीयांना त्रास दिला जाऊ नये”, असं रोहीत पवार यावेळी म्हणाले.