एकीकडे ज्या राष्ट्रवादीशी कदापि युती होणार नाही असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा त्याच अजित पवारांशी हातमिळवणी केली. दुसरीकडे ज्या अजित पवारांच्या कारभारावर टीका करत शिवसेना व सत्तेतून शिंदे गट बाहेर पडला, त्याच अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा दिल्या. यावरून सध्या राजकीय वर्तुळात सत्ताधारी व विरोधकांमध्ये टोलेबाजी चालू आहे. ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊतांनी नाशिकमध्ये बोलताना यावरून शिंदे गटाला टोला लगावला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही एक फोटो शेअर करत भाजपाला लक्ष्य करणारं खोचक ट्वीट केलं आहे.
काय आहे फोटोमध्ये?
रोहित पवारांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये एक मोठा ट्र दिसत असून त्यामागे ट्रॉलीवर एक रेल्वेचं इंजिन आहे. हा ट्रक धीम्या गतीनं एखाद्या घाट रस्त्यावरून जात असल्याचा अंदाज फोटोवरून लागत आहे. या ट्रकच्या मागे काही वाहनं अडकून पडल्याचं चित्र फोटोतून निर्माण झालं आहे. हा फोटो शेअर करत रोहित पवारांनी भारतीय जनता पक्षाबरोबरच शिंदे गट व अजित पवार गटाला टोला लगावला आहे.
“…म्हणून अर्थखात्याबाबत यांनी माघार घेतली, माझी पक्की माहिती”, राऊतांचा मोठा दावा
काय आहे ट्वीटमध्ये?
हा फोटो लोणावळ्यातील घाटातला असल्याचं रोहित पवारांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे. “लोणावळ्यात ट्रकवरच हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली. स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना. खरंतर रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर! आणि मार्ग चुकला तर स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून चालण्याची वेळ येते. जसं राजकारणासाठी भाजपाने चुकीचा मार्ग निवडलाय”, असं रोहित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“आता या इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचाच आहे का? आणि ट्रकची चेसी बारामतीलाच तयार झालेली आहे का? हे मात्र तपासावं लागेल”, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.