एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेला दसरा मेळावा कोण, घेणार यावरून वाद रंगला होता. शिवसेना आणि शिंदे गटाने पालिकेत शिवाजी पार्कसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही अर्ज फेटाळण्यात आले. त्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने यावर सुनावणी करत शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.
तब्बल ५६ वर्षांपासून शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे अतूट समीकरण आहे. बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसैनिकांना नवा कार्यक्रम द्यायचे. त्यामुळे शिवसैनिक दरवर्षी न चुकता विचारांचं सोनं लुटण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर आवर्जून यायचे. तोच धागा पकडून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे.
हेही वाचा – उच्च न्यायालयाचा निर्णय शिवसेनेच्या बाजूने, शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोवर कॅप्शन लिहलं की, “परंपरा अबाधित राहिली! सर्व निष्ठावान शिवसैनिकांचे अभिनंदन!”
“उत्साहात, शिस्तीने या, आनंदाला गालबोट लागेल…”
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “विजयादशमीच्या दिवशी जो मेळावा होणार आहे. त्यासाठी आपल्याला विजय मिळाला आहे. न्यायदेवतेवर जो आपला विश्वास होता. तो सार्थकी ठरला आहे. मी तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की, दसरा मेळाव्याला उत्साहात, शिस्तीने या, आनंदाला गालबोट लागेल, असं कोणतेही कृत्य होऊ देऊ नका. इतर काय करतील माहिती नाही. या मेळाव्याकडे जगाचे लक्ष लागले आहे,” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.