बीड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर कायमच चर्चेत असतात. त्यांचा एका लग्नातला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमरसिंह पंडित यांच्या पुतण्याचं लग्न शिर्डीत होतं. त्यावेळी संदीप क्षीरसागर हे मै हूँ डॉन या गाण्यावर नाचले आहेत. संदीप क्षीरसागर यांच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आमदार संदीप क्षीरसागर यांचा व्हिडिओ व्हायरल
आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अमरसिंह पंडित यांच्या पुतण्याच्या विवाहासाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. याच सोहळ्यात संदीप क्षीरसागर आले असता त्यांनी ढगाला लागली कळ आणि मै हूँ डॉन या दोन गाण्यांवर जबरदस्त डान्स केला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडीत यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे.
लोकांना आली त्या आव्हानाची आठवण!
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा हा डान्स पाहून लोकांना वर्षभरापूर्वीच्या आव्हानाची आठवण आली आहे. मागच्या वर्षी संदीप क्षीरसागर आणि त्यांचे चुलत भाऊ योगेश क्षीरसागर यांच्यात शाब्दिक जुगलबंदी झाली होती. त्यावेळीही मै हूँ डॉन हे गाणं चर्चेत आलं होतं.
काय घडलं होतं फेब्रुवारी २०२२ मध्ये?
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी एका भाषणात पुष्पा या सिनेमातला मै झुकेगा नहीं. हा डायलॉग म्हटला. त्यांच्या या डायलॉगची चर्चा राज्यभरात रंगली होती. त्यानंतर त्यांचे सख्खे चुलत भाऊ योगेश क्षीरसागर यांनी यावर उत्तर देताना मै हूँ डॉन असं म्हटलं होतं. तसंच पुष्पाला सांगा डॉन आला आहे असंही आव्हान योगेश क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांना दिलं होतं. या दोघांचे भाषणातले दोन डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता संदीप क्षीरसागर यांना मै हूँ डॉन या गाण्यावर नाच करणाऱ्या संदीप क्षीरसागर यांना पाहून लोकांना वर्षभरापूर्वीच्या या दोन भावांमधल्या जुगलबंदीची आठवण आली आहे.