वाई:प्रशासकिय अधिकारी पक्षपातिपणे काम करत आहेत.शिंदे, फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे सुडबुद्धीने वागत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. या विरोधात आवाज उठवण्यासाठी गुरुवारी (दि २३) राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध लाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी अधिकाऱ्यांचा पुराव्यांसह पोलखोल करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आज येथे दिला.
राष्ट्रवादी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, गोरखनाथ नलवडे, तेजस शिंदे, अतुल शिंदेंसह युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात राजकारण विरहित वातावरण होते, मात्र, सत्ता बदलानंतर सहा, सात महिन्यात विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह इतर सर्व अधिकारी एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखे वागत आहेत.
ते कोणाच्या दबावाखाली काम करतात हे पुराव्यासह उघडकीय आणणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरुवारी सकाळी दहा वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा लाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय भंगार चोरीबाबत एक महिन्यात कारवाईचे आश्वासन देऊनही अद्याप कोणी गुन्हा दाखल करायचा यातच सर्व अडकून पडले आहे.
भंगार चोरणाऱ्यांशी या अधिकाऱ्यांशी साटेलोटे आहे. शासकिय अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करतात, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आहे. शेतकऱ्यांची कर्ज माफीचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. शेतकऱ्यांची वीज तोडणे केली जात आहे. विज वितरणकडे डीपींची कमतरता आहे. नोकरभरतीकडे दूर्लक्ष झालेले आहे. या सर्व बाबींवर आवाज उठविला जाणार आहे. एकुणच प्रशासकीय अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या हातातील कटपूतली झाले आहेत. सुडबुद्धीने अधिकारी पूर्णपणे एकतर्फी वागत आहेत. हा जिल्ह्याचा मोर्चा असून कोरेगावमधून वाईट प्रवृत्ती हटविण्यासाठी आगामी काळात लढणार असल्याचे आमदार शिंदेंनी सांगितले.