शरद पवारांनी आज मावळमध्ये झालेल्या जाहीर कार्यक्रमात बोलताना अजित पवार गटाचे स्थानिक आमदार सुनील शेळके यांना थेट दम भरला. “जर इथल्या कार्यकर्त्यांना पुन्हा दमदाटी केली, तर मला शरद पवार म्हणतात”, असा थेट इशारा शरद पवारांनी सुनील शेळके यांना दिल्यानंतर त्यावर आमदार सुनील शेळकेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, शरद पवारांनी बोलण्याआधी माहितीची खातरजमा करून घ्यायला हवी होती, अशी पुस्तीही त्यांनी पत्रकार परिषदेत जोडली. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा सुंदोपसुंदी रंगण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले शरद पवार?

लोणावळ्यात घेतलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना शरद पवारांनी स्थानिक आमदाराने शरद पवार गटात प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचा दावा केला. “इथल्या दमदाटी करणाऱ्या आमदारांना मला सांगायचंय, बाबा रे, तू कुणामुळे आमदार झालास आठवतंय का? तुझ्या प्रचारसभेला कोण आलं होतं आठवतंय का? पक्षाचा फॉर्म आणि चिन्ह कुणी दिलं? माझ्या सहीनं तू तुझा अर्ज भरला होता आणि आज त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता?” अशी संतप्त विचारणा शरद पवारांनी केली. तसेच, “पुन्हा दमदाटी केली तर शरद पवार म्हणतात मला. मी कधी या रस्त्याने जात नाही, पण तशी स्थिती निर्माण झाली तर कुणाला सोडत नाही”, असंही शरद पवार म्हणाले.

आमदार सुनील शेळकेंची पत्रकार परिषद

शरद पवारांच्या भाषणानंतर काही वेळातच आमदार सुनील शेळकेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिलं. “मेळाव्याचं आयोजन करणाऱ्यांनी शरद पवारांना काही माहिती दिली. ‘मावळमधले शेकडो कार्यकर्ते अजित पवारांना सोडून शरद पवारांबरोबर यायला तयार आहे, तुम्ही त्यासाठी मावळमध्ये या’ अशी खोटी माहिती देऊन शरद पवारांना निमंत्रित केलं. सुनील शेळकेनी कार्यकर्त्यांना कार्यक्रमाला न जाण्याबाबत दमदाटी केल्याचं शरद पवारांना या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. शरद पवारांनी त्यावर लगेच प्रतिक्रिया दिली. ते आमच्यासाठी आजही श्रद्धेय आहेत. पण त्यांनी या बाबतीत वक्तव्य करताना शहानिशा करणं अपेक्षित होतं”, असं सुनील शेळके म्हणाले.

“…तर शरद पवार म्हणतात मला’, पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा; म्हणाले, “मी त्या वाटेने गेलो तर…”

“मी दमदाटी केलेली एक व्यक्ती दाखवा, नाहीतर…”

“मी या बाबतीत शरद पवारांना भेटून विचारणार आहे. माझी काय चूक झाली आहे, हे त्यांनी सांगावं. कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेली माहिती खरी की खोटी हे त्यांनी तपासून पाहायला हवं होतं. पुढच्या ८ दिवसांत मी ज्याला फोन केला किंवा दमदाटी केली अशी एक तरी व्यक्ती उभी करावी, नाहीतर मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की शरद पवारांनी मावळमध्ये येऊन माझ्यावर खोटे आरोप केले. मी शरद पवारांना आव्हान देतो. त्यांना ज्यांनी माहिती दिली, त्यांनी एकतर पुरावे द्यावेत नाहीतर शरद पवारांनी माझ्या बाबतीत केलेलं वक्तव्य खोटं होते हे सांगावं”, असंही सुनील शेळके यावेळी म्हणाले.

“शरद पवारांनी माझ्या बाबतीत अशी टीका करणं मला अपेक्षित नव्हतं. त्यांनी माझ्यावर केलेल्या टीकेमध्ये काय तथ्य होतं, हे शरद पवारांनी मला सांगितलं पाहिजे”, अशा शब्दांत सुनील शेळकेंनी शरद पवारांवर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla sunil shelke slams sharad pawar speech maval constituency pmw
Show comments