गेल्या काही दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना घेऊन राज्य सरकारला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’नं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून त्यात अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तयार असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच वृत्तावरून सध्या राजकीय वर्तुळात वातावरण तापलं आहे. भाजपा आणि शिंदे गटाकडून यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी टीव्ही ९ शी बोलताना अजित पवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात खरंच राजकीय भूकंप होणार का? यावर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
अण्णा बनसोडे म्हणतात, “मी अजित पवारांसोबत”
पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रतिक्रिया देताना अजित पवार जो काही निर्णय घेतील, त्यापाठीशी आपण असल्याचं सांगितलं आहे. “अजित पवार जो काही निर्णय घेतील, त्या निर्णयाशी मी सहमत असेन. मी त्यांच्यासमवेत ठामपणे उभा राहीन. मी ऑफिसचं काम संपवून मुंबईला जाऊन त्यांची भेट घेईन. चर्चेत जे काही ठरेल, ते एक-दोन दिवसांत कळेल. दादांचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द झालेत. आमचाही दादांसोबत काही संपर्क नाही”, असं बनसोडे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
“सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत कोणताही निर्णय नाही”
आमदार माणिकराव कोकाटेंनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अजित पवार वेगळा काही निर्णय घेतील असं वाटत नाही म्हटलं आहे. “अजित पवार भाजपाबरोबर जाणार असतील, राष्ट्रवादीही जाणार असेल तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार यात काही शंकाच नाही. पण मला वाटत नाही की पक्षाविरोधात अजित पवार काही वेगळा निर्णय घेतील. ती परिस्थिती अजून राज्यात निर्माण झालेली नाही. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी पक्ष कोणताही निर्णय घेणार नाही. मुख्यमंत्री अपात्र ठरेपर्यंत या बातम्यांना काही अर्थ आहे असं मला वाटत नाही”, असं कोकाटे म्हणाले आहेत.
“माझ्याकडे पक्की माहिती आहे की…”, संजय राऊतांचा अजित पवारांबाबत दावा; म्हणाले, “आज सकाळी आम्ही…!”
माणिकराव कोकाटे आणि अण्णा बनसोडे यांच्याप्रमाणेच नाशिकचे नितीन पवार यांनीही अजित पवारांना पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. “मी दादांचा खंदा समर्थक आहे. २०१९ साली पहाटेचा शपथविधी झाला होता तेव्हा मी अजित पवारांसोबत होतो. त्यांच्यासोबत मी दिल्लीला होतो. तसं काही झालं, तर नक्कीच नाशिकचे आमदार अजित पवारांसोबत राहतील असं मला वाटतं”, असं नितीन पवार म्हणाले.
“अजित पवार जातील असं वाटत नाही”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांनी मात्र अजित पवार असं काही करण्याची शक्यता फेटाळून लावली. “आम्ही सर्वजण मिळून शरद पवार यांच्याबरोबर आहोत आणि मिळून राहू. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वडिल, मुलाचं नात आहे. सुप्रिया सुळे, जयंत पाटील जितेंद्र आव्हाड हा आमचा परिवार आहे. त्यामुळे अजित पवार जातील असं वाटत नाही. भाजपा अजित पवारांना गळाला लावत आहे, हे सुद्धा वाटत नाही. लोकांच्या मागण्या, जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न यासाठी अजित पवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात”, असं सुनील भुसारा म्हणाले.