गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुढील वर्षीच्या निवडणुकांनंतर नेमकं मुख्यमंत्री कोण होईल? यावर राजकीय दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. एकीकडे सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही एका नावावर शिक्कामोर्तब होताना दिसत नाहीये. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात मांडलेल्या जाहीर भूमिकेची चर्चा होऊ लागली आहे. त्यांच्यालेखी महाराष्ट्राचे आदर्श मुख्यमंत्री कोण आहेत? याबाबत त्यांनी भाष्य केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी पूर्ण झाली असून अद्याप त्यावर निर्णय आलेला नाही. त्या १६ आमदारांमध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. मात्र, असं असलं, तरी देवेंद्र फडणवीसांनी २०२४ च्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, याला भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची मान्यताही आवश्यक ठरेल. दुसरीकडे मविआमध्ये कधी अजित पवार तर कधी पुन्हा उद्धव ठाकरे यांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी घेतली जात आहेत. त्यामुळे आगामी मुख्यमंत्री कोण होईल? यावर जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
या सर्व चर्चांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यात आता मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यात भर पडली आहे.
कोण आहेत अमोल कोल्हेंचे ‘आदर्श मुख्यमंत्री’?
बुधवारी अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. त्याचवेळी तेच आदर्श मुख्यमंत्री असल्याचाही अमोल कोल्हेंनी उल्लेख केला. “शिवस्वराज्य यात्रेची संपूर्ण आखणी सुरू असताना मी कायम बघायचो. अनेकदा आम्ही कधी कार्यालयात भेटायचो, कधी साहेबांच्या घरी भेटायचो. एका सुसंस्कृत घरातला तरुण काय असू शकतो, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रतीक दादा आणि राजवर्धन दादा. यात कुठेही अवाजवी, स्वत:हून काही सांगणं नाही. काही विचारल्याशिवाय स्वत:हून काही बोलणं नाही अशी त्यांची वागणूक राहिली”, असं कोल्हे म्हणाले.
“हे पाहात असताना एक गोष्ट मला कायम जाणवली.असं म्हणतात की नेत्यांची मुलं कायम उद्धट असतात. हे आपल्याला अनेकदा बघायला मिळतं. जेव्हा पिता इतका कर्तृत्ववान असतो, एवढा मोठा कर्तृत्वसंपन्न असतो. महाराष्ट्र राज्याचं सर्वात जास्त वेळा अर्थमंत्रीपद भूषवलेलं आणि आजही ज्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा सर्वात आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहातो, अशा कर्तृत्वसंपन्न पित्याचं (जयंत पाटील) कर्तृत्व समोर असताना पित्याच्या कर्तृ्त्वाचा माज नाही, तर पित्याच्या कष्टांचं भान आणि पित्याच्या खांद्यावर असणाऱ्या जबाबदारीची जाण असणारं युवा नेतृत्व म्हणून प्रतीक पाटलांकडे मला बघावंसं वाटतं”, असा उल्लेख अमोल कोल्हे यांनी केला.