राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी काही काळासाठी संपर्कात नसल्याचं सांगत एकांतवासात जात असल्याची पोस्ट केली. यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. या पोस्टमध्ये त्यांनी मागील वर्षभरात काही टोकाचे निर्णय घेतल्याचं सांगत त्यावर फेरविचार करणार असल्याचंही नमूद केलं. त्यामुळे त्यांच्या राजकीय संन्यासापासून पक्षांतरापर्यंत तर्कवितर्क लावण्यात आले. मात्र, आता स्वतः अमोल कोल्हे यांनीच समोर येऊन त्यांच्या एकांतवासामागील कारणं स्पष्ट केलीय. त्यांनी ट्वीट करत याची माहिती दिली.
अमोल कोल्हे म्हणाले, “मी ७ नोव्हेंबरला सोशल मीडियावर माझ्या एकांतवासाविषयी एक पोस्ट केली. त्यानंतर चर्चेला उधाण आलं. सर्वजण माझ्या एकांतवासाविषयी करत असलेली चर्चा, लावत असलेले तर्क पाहिल्यानंतर या एकांतवासाविषयी मीच उलगडा करण्याचं ठरवलं. या पोस्टच्या निमित्ताने एकांतवास, सिंहावलोकन, आत्मचिंतन, फेरविचार, मानसिक थकवा या शब्दांचा बराच उहापोह झाला. काही जणांनी सहमती दाखवली, काही जणांनी सहानुभुती दाखवली, काहींनी टीका केली. काहींनी तर थेट राजकीय संन्यासाचा तर्क लावला. काहींच्या कल्पनेची भरारी थेट राजकीय पक्षांतरापर्यंत गेली.”
“मानसिक थकवा ही मला सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते”
“मला मानसिक आरोग्याच्या जाणीवेची गरज अधोरेखित झाली. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला येऊ शकणारा आणि येऊनही दुर्लक्षिला जाणारा मानसिक थकवा ही मला सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते. ऐन तिशीतील तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, पस्तीशीत मधुमेहाची सुरुवात अशा अनेक गोष्टी आपल्या कानावर येतात. ह्रदय विकार, मधुमेह, डोकेदुखी, पोटाचे आजार ते मानसिक विकार, अस्थमा अशा अनेक आजारांचं मूळ कारण मानसिक तणाव हे आहे. लोक प्रतिनिधी, अभिनेता म्हणून नाही तर डॉक्टर या नात्यानं मी हे सांगतोय,” असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.
“पुरुषप्रधान संस्कृतीमुळे पुरुषांनी कधी रडायचं नसतं असा गैरसमज”
अमोल कोल्हे म्हणाले, “आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं, तू कणखर आहेस, तू रडायला नको, पुरुषांनी कधी रडायचं नसतं, पुरुषांनी आपल्या भावना सार्वजनिकपणे व्यक्त करायच्या नसतात. या सर्व संस्कारातून एक गैरसमज रुढ होतो. तो म्हणजे पुरुषांनी भावनिकदृष्ट्या हळवेपणाने व्यक्तच व्हायचं नाही. पुरुषांना लहानपणापासून व्यक्त होण्याचा एकच उपाय दिसतो तो म्हणजे आक्रमकता. उचल हात, कर भांडण, वाटलं तर हासड शिवी. नागरिकरणाच्या अनेक टप्प्यांवर पुरुषप्रधान संस्कृती स्वीकारली गेली असेल, त्यामुळे हे अनेक पिढ्या चालू असेल.”
“मानसिक तणावामुळे अनेक व्याधी डोकं वर काढतात”
“हळूहळू जग बदलू लागलं, स्पर्धात्मक होऊ लागलं. सुरुवातील निकोप असणारी ही स्पर्धा बदलली. त्यानंतर स्वप्न, महत्वकांक्षा आणि गरज या तीन गोष्टींमधील सीमारेषाच पुसट झाली. प्रत्येकजण धावू लागला आणि कुणासाठी धावतोय हेच माणूस विसरला. माणूस स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मित्रांसाठी समाजासाठी धावतोय का? की इतर लोक हसतील या भितीपोटी धावतो आहे? मानसिक तणावामुळे अनेक व्याधी डोकं वर काढतात,” असंही त्यांनी सांगितलं.
“म्हणूनच व्यक्त व्हा, मोकळे व्हा असं सांगतो. कुणी याला कमकुवतपणा, मानसिक कणखरतेचा अभाव आहे असं म्हणेल. पण ही बेगडी विशेषणं आहेत. त्यानं तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे व्यक्त होणं हे जीवंतपणाचे आणि संवेदनशीलतेचं लक्षण आहे. आजच्या काळात ते जास्त महत्त्वाचं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
“थकवा सर्वांनाच येतो, जाहीरपणे सांगण्याची काय गरज?”
अमोल कोल्हे म्हणाले, “माझे एक मित्र मला म्हणाले थकवा सर्वांनाच येतो, जाहीरपणे सांगण्याची काय गरज होती? माझी यामागे एक प्रामाणिक भावना आहे. लोकप्रतिनिधी किंवा सेलिब्रेटी यांचं काही प्रमाणात अनुकरण केलं जातं. हे खरं असेल तर याबाबतीत माझं अनुकरण केलेलं मला आवडेल. मानसिक थकवा स्विकारण्यातून आणि तो दूर करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नातून ऐन तारुण्यात होणारा ह्रदय विकाराचा एक जरी मृत्यू वाचला तरी या सगळ्याचं चीज झालं असं मला वाटतं.”
हेही वाचा : “टोकाचे निर्णय घेतले, काही काळ संपर्क होणार नाही, लवकरच…”, अमोल कोल्हेंच्या पोस्टची जोरदार चर्चा
“या एकांतवासात मी काय विचार केला, काय निर्णय घेतला हे येणाऱ्या भविष्य काळात तुम्हाला समजेलच. आपली वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी, ध्येय निश्चितीसाठी आणि तो मार्ग ठरवण्यासाठी अंतर्मुख होणं गरजेचं असतं. तसाच मी काही काळ अंतर्मुख होतो. आता नव्या जोशानं पुन्हा सिद्ध झालोय. यात व्यक्त होण्याचं माध्यम सापडलंय. ते म्हणजे स्वतःचं यूट्यूब चॅनल ‘अमोल ते अनमोल’. हा चॅनल सबस्क्राईब करा,” असं आवाहनही अमोल कोल्हे यांनी केलं.