गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा चालू आहे. यात अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आदर्श मुख्यमंत्री म्हटल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अजित पवार यांच्याही नावाची चर्चा भावी मुख्यमंत्री म्हणून होत असून तसे बॅनर्सही काही भागांत झळकले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मुख्यमंत्रीपदाबाबत दोन गट पडलेत का? अशीही चर्चा पाहायला मिळाली. एकीकडे अमोल कोल्हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगत असताना दुसरीकडे त्यांनी जयंत पाटलांचा उल्लेख केल्यामुळे त्यात भर पडली. यासंदर्भात त्यांनी स्वत:च माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना अनुपस्थिती का?

गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हेंची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना असणारी उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. यावर अमोल कोल्हेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. “नाटकाचे प्रयोग असतील तर कार्यक्रमांना मी उपस्थित राहूच शकणार नाही. याची पूर्ण कल्पना पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला असते. आमच्या वरीष्ठ नेत्यांना असते. त्यामुळे मी आणि आमचे नेतेमंडळी जे सांगतात त्यात विसंगती दिसणार नाही”, असं ते म्हणाले.

उदयनराजेंची भेट घेतल्याने भुवया उंचावल्या

दरम्यान, अमोल कोल्हेंनी गुरुवारी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्यानेही अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मात्र, या भेटीनंतर अमोल कोल्हेंनीच यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “दुर्दैवानं राजकारणाचा पोत आपण बदललेला बघतो आहोत. मी आत्ता खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. मग यावर अमोल कोल्हे आणि उदयन राजे भोसले यांचे संबंध काय आहेत याचा विचार न करता राष्ट्रवादीचा खासदार भाजपाच्या खासदारांना भेटला असं तुम्हाला म्हणायचं असेल, तर नक्कीच राजकारण आहे. पण संभाजी महाराजांची भूमिका करणारा एक कलावंत जर महाराजांना भेटला, तर यामध्ये राजकारण दिसणार नाही”, असं ते म्हणाले.

जयंत पाटील वि. अजित पवार?

एकीकडे अजित पवारांच्या नावाची भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा असताना दुसरीकडे अमोल कोल्हेंनी जयंत पाटील यांचं नाव घेत चर्चेची राळ उडवून दिली होती. “त्या वक्तव्यावर बातम्या लागल्या आहेत. त्याचा संदर्भ बघितला तर त्या कार्यक्रमात एका कार्यकर्त्यानं जयंत पाटील यांच्या चिरंजीवांच्या खासदारकीबाबत इच्छा व्यक्त केली होती. त्यावरचं हे माझं स्पष्टीकरण होतं की खासदारकी कुणी लढायची, राज्यात कुणी राहायचं आणि दिल्लीत कुणी जायचं असा प्रश्न असेल तर जयंत पाटील यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही पाहातो. पण यात कुठेही जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात तुलना करण्याचा कुठेही विषय नाही किंवा हे दोन गट असल्याचा रंग देण्याची आवश्यकता नाही”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हेंचं ‘ते’ विधान आणि चर्चांना उधाण! वाचा सविस्तर

“शरद पवार यांचा यात अंतिम निर्णय असेल. दोघांपैकी कुणीही मुख्यमंत्री झालं, तरी आम्हाला आनंदच असेल. कारण दोघांची दोन वेगळी वैशिष्ट्य आहेत. अजित पवारांचा कामाचा उरक, झपाटा १०० टक्के आहे. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद असावं हे आवडतंच. त्यामुळे याला वेगळा रंग देण्याची गरज नाही”, असंही अमोल कोल्हेंनी यावेळी सांगितलं.

काय म्हणाले होते अमोल कोल्हे?

“एक गोष्ट मला कायम जाणवली.असं म्हणतात की नेत्यांची मुलं कायम उद्धट असतात. हे आपल्याला अनेकदा बघायला मिळतं. जेव्हा पिता इतका कर्तृत्ववान असतो, एवढा मोठा कर्तृत्वसंपन्न असतो. महाराष्ट्र राज्याचं सर्वात जास्त वेळा अर्थमंत्रीपद भूषवलेलं आणि आजही ज्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा सर्वात आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहातो, अशा कर्तृत्वसंपन्न पित्याचं (जयंत पाटील) कर्तृत्व समोर असताना पित्याच्या कर्तृ्त्वाचा माज नाही, तर पित्याच्या कष्टांचं भान आणि पित्याच्या खांद्यावर असणाऱ्या जबाबदारीची जाण असणारं युवा नेतृत्व म्हणून प्रतीक पाटलांकडे मला बघावंसं वाटतं”, असा उल्लेख अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mp amol kolhe on jayant patil ideal cm ajit pawar leadership pmw
Show comments