संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविथी पार पडला. त्यानंतर आज लोकसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संसदेत बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उल्लेख करताना ओरिजिनल राष्ट्रवादी असा केला. यावर आता राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून टीका करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी सुनील तटकरेंना खोचक टोला लगावला आहे. “ओरिजिनल राष्ट्रवादी बोलण्याआधी सुनील तटकरे यांनी त्यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट पहावा. तसेच २० टक्के मिळणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्याकडे पासही करत नाहीत”, असा खोचक टोला अमोल कोल्हे यांनी लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमोल कोल्हे काय म्हणाले?

“मला वाटतं सुनील तटकरे हे स्वत:चं समाधान करत असतील. कारण आपण जर लोकसभा निवडणुकीच्या जागांची आकडेवारी पाहिली तर अजित पवार गटाने एकूण पाच जागा लढवल्या. पाच पैकी फक्त एक जागा निवडून आली, म्हणजे फक्त २० टक्के स्ट्राईक रेट झाला. राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या शरद पवार गटाने एकूण १० जागा लढवल्या. त्यामधील ८ जागा निवडून आल्या, म्हणजे स्ट्राईक रेट ८० टक्के झाला. आपल्याकडे शाळेत २० टक्के मिळणाऱ्या विद्यार्थ्याला पासही करत नाहीत आणि ८० टक्के मिळणाऱ्या विद्यार्थ्याला मेरीटवर आला असं म्हणतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं हा कौल दिला आहे. जनतेचा कौल हा शरद पवार यांच्या बाजूने आहे. त्यामुळे स्वत:चं समाधान करण्यासाठी सुनील तटकरे असं बोलले असतील”, असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा : अजित पवार गटाला महायुतीत किती जागा मिळणार? रोहित पवारांचा खोचक टोला; म्हणाले, “२० ते २२ जागा…”

केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्रिपद मिळालं नाही, यासंदर्भात बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, “एवढा मोठा निर्णय घेऊन महायुतीत सहभागी झाल्यानंतरही लहान पक्षाना मंत्रिपद मिळत असताना अजित पवार गटाला एक मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे याचं शैल्य तटकरे यांच्या मनात असेल. त्यामुळे या माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असेल. सुनील तटकरे यांच्याकडे त्यांच्या पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारांचं मनोधैर्य वाढवण्याचा त्यांचा हा एक प्रयत्न असू शकतो”, असंही खासदार कोल्हे म्हणाले.

“लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी आपण पाहिली तर त्यांच्याकडे असणाऱ्या ४० आमदारांपैकी केवळ ५ आमदारांच्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली. ३५ आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या आमदारांच्या मनात नक्कीच धाकधूक वाढली असणार आहे. त्यामुळे त्याचं मनोधैर्य वाढण्याचा हा प्रयत्न सुनील तटकरे यांनी केला असेल”, असा खोचक टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mp amol kolhe on ncp ajit pawar group mp sunil tatkare politics gkt