मागील काही दिवसांत शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीतील काही नेत्यांकडून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर अशा नेत्यांचा समावेश आहे. सध्याच्या या राजकीय स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मार्मिक कविता सादर केली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
संबंधित व्हिडीओत अमोल कोल्हे म्हणाले, “खरं तर, हा व्हिडीओ खूप आनंदाने किंवा उत्साहाने करत नाहीये, पण गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात सातत्याने जे घडत आहे, त्यावर व्यक्त व्हावंसं वाटलं, म्हणून हा व्हिडीओ केला आहे. काल याच विषयावर देशाच्या सर्वोच्च सभागृहातही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण आज पुन्हा एक घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा व्यक्त व्हावंसं वाटलं. त्यासाठी एक कविता केलीये, ती कविता तुमच्यासाठी सादर करतो…”
“राज्यकर्त्यांचे भान सुटलं तरी जनतेला मात्र जाण आहे” – खासदार अमोल कोल्हे
जागलेली माणसं, वाचलेली पुस्तकं
रुजलेले विचार सारे कुतुहलाने गोळा झाले
हे नवीन पुतळे, ते नवीन बॅनर
एवढ्या अचानक कुठून आले?
पुतळ्यांच्या गळ्यात चपलांचे हार
प्रत्येक बॅनरला जोड्यांचा प्रसाद
रुजल्या विचारांनी आस्थेनं विचारलं
काय झालं?
पुन्हा कोणी समाज सुधारण्यासाठी
काम सुरू केलं?
प्रश्नासरशी
बॅनर्सने लाजेने अंग गुंडाळून घेतलं
पुतळ्यांनी तर शरमेनं तोंडं लपवली
तरीही एका जागल्या माणसानं
त्यांची ओळख पटवली…
बॅनरवरील चेहरा पाहिला होता
भला मोठा हार घालताना
आवाजसुद्धा ऐकला होता
जोशपूर्ण भाषण ठोकताना..
अरेच्चा! हे तर तेच महोदय…
हे तर ते, ते तर हे म्हणता म्हणता
सगळ्या चेहऱ्यांची ओळख पटली…
निषेध… उद्वेग… संताप…
सारं काही उमटलं होतं
प्रत्यक्षात जमत नाही म्हणून
बॅनर पुतळ्यांना कुटलं होतं
कळवळून शेवटी एक पुतळा बोलला
जोडे खाऊन खाऊन आम्हालाच कंटाळा आला…
डोक्यात शेण भरलंय त्यांच्या
अन् भोग मात्र आमच्या वाट्याला…
महापुरुषांच्या नखाचीही सर नसताना
का जावं अकलेचे तारे तोडायला
समाधानाने मग पुस्तकं फडफडली
म्हटली चला, आमच्या शब्दांमध्ये अजून जान आहे
राज्यकर्त्यांचे भान सुटलं
तरी जनतेला मात्र जाण आहे..