राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीचा काँग्रेसतर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुन्हा एकदा शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे असा सूर उमटला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांनी देशाचे नेतृत्त्व करावे जर गुजरातमध्ये २६ खासदार असताना पंतप्रधानपदी व्यक्ती विराजमान होऊ शकते मग ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातून शरद पवार सुद्धा विराजमान होऊ शकतात असे म्हटले.

यावेळी बोलताना, “शरद पवार हे शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत. महिलांना लष्करात भरती, राजकारणात आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याची अमंलबजावणी केली. याच महिलांनू आज प्रगतीची शिखरे गाठली आहेत. त्यामुळे शरद पवार हे फुलेंचे वैचारिक वारसदार आहेत. त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. शरद पवार हे गेली चाळीस वर्ष दिल्लीतील राजकारणाची ओळख बनून राहिले आहेत. आमच्या नेत्याला पाच लाखाचा सूट घालावा लागत नाही. हजारो रुपयांचे तैवानी मशरुम खावे लागत नाही,“ असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला. बिहार, पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर त्यांचे नेते शरद पवार साहेबांना भेटायला येतात, त्यामुळे नेहमीच ‘हर अर्जुन का सारथी’ हे त्यांना लागू होते, असंही कोल्हे म्हणाले.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुंबईत नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलत असताना अमोल कोल्हे यांनी शरद पवारांचे कौतुक करत त्यांनी देशाचे नेतृत्व करावे अशी मागणी केली.

“आता काळाची गरज आहे, देशात परिस्थितीत कुरक्षेत्रात झाली आहे. त्यामुळे पुढील वर्षात महाराष्ट्र आणि देश कसा असावा याचा विचार करावा लागणार आहे. यासाठी सेनापती म्हणून शरद पवार आज आपल्यासोबत आहे. त्यांच्या विचारांना घेऊन आपल्याला पुढे लढावे लागणार आहे,” असे अमोल कोल्हे म्हणाले.

“आज देशभरात जातीपातीचे राजकारण सुरू आहे. धार्मिक उन्माद उफाळून आला आहे. प्रत्येक समाजामध्ये टोकाच्या भूमिका निर्माण झाल्या आहे. त्यामुळे देशाला पवार साहेबांच्या नेतृत्त्वाची गरज आहे. जर २६ खासदार असलेली गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकते तर तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रामध्ये महाराजांचा मावळा हा सर्वोच्च स्थानी का विराजमान होणार नाही. असा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे,” अशी भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

Story img Loader