“सध्या देशात राम मंदिराची चर्चा सुरू आहे. अनेकजन त्याबाबत विधानं करत आहेत. काही राजकीय पक्ष तर ही आमची मक्तेदारीच आहे, असे म्हणतात. त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, प्रभू श्रीरामचंद्र जेवढे तुमचे आहेत, तेवढेच आमचे आहेत. चार खांद्यावरून नेताना आम्हीही ‘जय राम श्री राम, जय जय राम’ म्हणतो. पण आमच्या मंदिरातील श्रीरामचंद्र हे धनुष्यबाण ताणलेले नाहीत. तर ते आशीर्वादाचा हात उंचावलेले, माता सीतामाई, बंधू लक्ष्मण आणि हनुमान यांच्यासह कुटुंबवत्सल प्रभू श्रीरामचंद्र आहेत”, असे विधान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात केले.
राम मंदिराबाबत बोलताना अमोल कोल्हे पुढे म्हणाले, “ग्रामीण भागात माणसाला माणूस भेटला तर राम राम म्हणतो. राम राम म्हटल्याने माणूस जोडला जातो. राम राम म्हणून माणूस जोडणारा देश आम्हाला हवा आहे. प्रभू श्रीरामाविषयी जेव्हा आम्हाला शिकवलं जातं, तेव्हा एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असल्याचे सांगितले जाते. तिसऱ्या विषयावर मी जाहीर बोलणार नाही. पण एकबाणी आणि एकवचनी या तत्त्वांबाबत बोलले पाहीजे. निवडणुकीच्या आधी वचनं द्यायची आणि मग ‘चुनावी जुमला’ असल्याचं सांगून टाळायचं, अशांना प्रभू श्रीराम कसे पावतील?”
“आमच्या प्रभू श्रीरामांनी लंकेला जाऊन सीतामाईंना सोडवून आणलं, स्त्रीचं रक्षण करणारे श्रीराम होते. पण आमच्या महिला कुस्तीपटूंवर काय वेळ आली, ते देशाने पाहिलं. महिला कुस्तीपटूंना जर कुस्तीलाच राम राम ठोकावा लागत असेल आणि सत्ताधारी महिलांचे शोषण करणाऱ्यांना आश्रय देत असतील तर त्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील?” असे काही प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केले.
यावेळी अमोल कोल्हे यांनी नारायणगावातील त्यांच्या परिचयाच्या गृहस्थांसोबतचा संवाद आपल्या भाषणात उद्धृत केला. ते म्हणाले, सीतामाईचे हरण झाले, तेव्हा कांचनमृग होता. त्याच्यापाठी धावत असताना सीतामाईंचे अपहरण झालं. आता कांचनमृगाचे रुपडं बदललं आहे. कांचनमृगाने सोन्याचं कातडं नाही तर ५० खोक्यांचं जॅकेट घातलंय आणि जसं मृगाच्या बेंबीत कस्तूरी असते, तशी ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाकडून वाचण्याची कस्तूरी या नव्या कांचनमृगाकडे आहे. रामायणात सीतामाईचं अपहरण झालं होतं, कलियुगात पक्ष आणि चिन्हाचं अपहरण होत आहे, असे मला नारायणगावमधील परिचित व्यक्तीने सांगितले. मी त्यावर त्यांना म्हणालो, नुसतं पक्ष आणि चिन्हाचं नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचंही अपहरण झालं आहे, अशी उदाहरणं देऊन अमोल कोल्हे यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे – अजित पवार गटावर टीकास्र सोडले.