राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिलीय. हे सांगताना त्यांनी गेल्या वर्षभरात बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले आणि अनपेक्षित पावलंही उचलल्याचं कबूल केलं. त्यामुळे त्यांच्या या एकांतवासात जाण्याच्या निर्णयावरून राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलंय.

अमोल कोल्हे म्हणाले, “सिंहावलोकनाची वेळ. गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलंही उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल, पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन!”

“घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचार सुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू. नव्या जोमाने, नव्या जोशाने!” असंही अमोल कोल्हे यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं.

हेही वाचा : धनंजय मुडेंकडून आयोजित करण्यात आलेल्या सपना चौधरीच्या कार्यक्रमावर गृहमंत्री वळसेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

या पोस्टममध्ये अमोल कोल्हे यांनी टीप लिहित फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही, असं म्हणत खोचक टोलाही लगावला.

Story img Loader