रविवारी (२ जुलै) रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांच्याबरोबर नऊ आमदारांनी बंड केलं. अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांनीही शपथ घेतली. या शपथविधीनंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर दिसत आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार उभे आहेत आणि तिथे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे पोहोचतात. आधी हातमिळवणी करून कोल्हे मुनगंटीवारांच्या पाया पडतात. यावेळी ‘आपली काल परवाच भेट झाली’ असं म्हणत मुनगंटीवार अमोल कोल्हेंची पाठ थोपटतात.
अमोल कोल्हेनंतर तिथे दिलीप वळसे पाटील येतात. तेही बंड करणाऱ्या नऊ आमदारांपैकी आहेत. ते येतात आणि मुनगंटीवारांना भेटतात. मुनगंटीवार वळसे पाटलांना म्हणतात, “अभिनंदन, एकत्र काम करण्याची मजा आली. मला खूप आनंद झाला. देवेंद्रजींनी जेव्हा तुमचं नाव सांगितलं तेव्हा खूप आनंद झाला, छान”.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या व्हिडीओवर युजर्सही विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी बंडाचं समर्थन केलंय तर काहींनी मात्र याला विरोध केला आहे.