Bajrang Sonwane : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्य हादरलं. या घटनेचे पडसाद विधानसभा आणि लोकसभेमध्येही उमटले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत आणि खासदारांनी लोकसभेत हा विषय मांडून न्याय देण्याची मागणी केली. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर बीडचे खासदार बजरंग सोनवणे, खासदार निलेश लंके, आमदार संदीप क्षीरसागर हे देखील होते.
यावेळी मस्साजोग गावच्या ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार बजरंग सोनवणे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेबाबत बोलताना बजरंग सोनवणे यांनी म्हटलं की, “आपण कुठल्या जगात आहोत हे कळत नाही. बीड जिल्ह्यात एवढं दहशतीचं वातावरण झालं आहे की जिल्ह्यात सर्वसामान्य लोकांनी राहायचं की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संतोष देशमुख यांच्या घटनेने तर काळजाला पीळ पडतोय”, असं म्हणत बजरंग सोनवणे भावूक झाले.
बजरंग सोनवणे काय म्हणाले?
“संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी येत असताना काळजाला पीळ पडतो. एवढी लहान मुलगी देखील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करते. खरं तर आमच्या जिल्ह्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांनी राहायचं का नाही? अशी परिस्थिती आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मस्साजोग गावच्या महिला देखील आक्रमक झाल्या, त्यांनी देखील या घटनेला वाचा फोडली. ही घटना कशी घडली तर या ठिकाणी एका कंपनीचं काम सुरु आहे. त्या ठिकाणी आधी मारहाणीची घटना घडली. मात्र, त्या घटनेनंतर पोलिसांनी काही केलं नाही. गुन्हा देखील दाखल करून घेतला नाही. यामध्ये पोलीस यंत्रणेतील काही माणसं सामील आहेत असं माझं मत आहे”, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं.
“मस्साजोगची घटना घडल्यानंतर मी स्वत: बीडच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्कात होतो. मात्र, काही झालं नाही. त्यानंतर या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्याचा आणि आरोपीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. आता काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार आहोत. मात्र, मुळापर्यंत कधी जाणार हा प्रश्न आहे. मस्साजोगच्या घटनेला १३ दिवस झाले तरी मुख्य आरोपीला अटक झालेली नाही”, असं बजरंग सोनवणे म्हणाले.
“आमचा बीड जिल्हा एवढा दहशतीखाली आहे. पोलीस यंत्रणा काय करते हा प्रश्न आहे. संतोष देशमुख यांचे कुटुंब संरक्षण मागत आहे. तसेच आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींनाही वागणं मुश्किल झालं आहे. आज आम्ही या घटनेबाबत बोलतो आहोत. मात्र, यानंतर आम्हालाही टार्गेट केलं जाऊ शकतं. मस्साजोग घटनेचा खटला हा फास्टट्रॅकवर चालवला गेला पाहिजे. तसेच आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे”, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.