Bajrang Sonwane : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, या घटनेतील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्यानिषेधार्थ आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा खासदार बजरंग सोनवणे यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बजरंग सोनवणे काय म्हणाले?

“काही नेते मुंबई आणि दिल्लीत बसून म्हणतात की आमच्या बीड जिल्ह्याचं नाव खराब होत आहे. पण त्यासाठी जिल्ह्यात येऊन काम करावं लागतं. जिल्ह्यात सर्वांना भेटावं लागतंय. लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात, तेव्हा जिल्ह्यात काय चाललंय हे कळतं. मग तुम्ही बीड जिल्ह्यातील लोकांना का आधार देत नाहीत? बीडमधील लोकांना समोर येऊन का बोलत नाहीत? फक्त मुंबई आणि नागपूरमध्ये बाईट देता. पण जिल्ह्यात येऊन लोकांशी बोलून त्यांना आधार दिला पाहिजे. मात्र, असं होत नाही. ही घटना अतिशय चुकीची आहे. तसेच बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा ज्या पद्धतीने नियुक्त झालेली आहे. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा जो पर्यंत बदलणार नाही तोपर्यंत बीड जिल्हा सुधारणार नाही”, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

हेही वाचा : प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी केलं स्पष्ट; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…

“बीड जिल्ह्यात मोठमोठे उद्योग आणल्याशिवाय राहणार नाही. आज बेरोजगारी वाढली आहे. त्यासाठी आम्ही जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र, अशा प्रकारे खंडणी मागितल्याच्या घटना घडतात. पवनचक्कीवालेही शेतकऱ्यांना दादागिरी करतात. त्यामुळे कंपनीवाल्यांच्याही चौकशी करण्याची आवश्यता आहे. हा खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मग त्याआधी काय-काय झालंय हे देखील बाहेर काढलं पाहिजे. खंडणीचा गुन्हा हा पहिला गुन्हा नाही तर त्यांच्यावर याआधीही एक खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. तो गुन्हा मागे कसा घेतला गेला? त्याचं काय झालं?”, असा सवाल खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.

“मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या घटनेला आज २० दिवस झाले आहेत. या घटनेतील आरोपी कोण आहेत हे पोलिसांनी सांगितलं आहे. यातील चार आरोपींना अटक झाली आहे आणि तीन आरोपी अद्याप फरार आहेत आणि याची लिंक खंडणीशी आहे. मग याचा मास्टरमाईंड कोण आहे? या सर्व विषयाकंडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. पोलिसांनी या घटनेचा तपास करावा आणि या घटनेतील आरोपींना अटक करावी आणि न्याय द्यावा अशी मागणी आहे”, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं.

‘देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढत राहणार’

“माझी कोणाशीही काहीही चर्चा झालेली नाही. उपोषण करण्याचा निर्णय हा माझा आहे. मात्र, बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मला ज्यांनी निवडून दिले आहे. त्यांच्या न्यायासाठी लढणं हे माझं काम आहे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर मी उपोषण करणार आहे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी लढत राहणार आहे”, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mp bajrang sonwane on santosh deshmukh case beed morcha cm devendra fadnavis dhananjay munde walmik karad beed politics news gkt