लोकसभेच्या निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांच्यामध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली. या निवडणुकीत निलेश लंके यांनी मोठ्या मताधिक्यांनी सुजय विखे यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळालं होतं. नगर दक्षिण मतदारसंघातील या निवडणुकीची राज्यात चर्चा झाली होती. आता खासदार निलेश लंके यांनी विखे कुटुंबियाबाबत बोलताना केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. ‘विखे कुटुंबियांचा आपल्याला अभिमान असून आशीर्वाद घेण्यासाठी लवकरच राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटणार आहे’, असं निलेश लंके यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.
निलेश लंके काय म्हणाले?
“लोकसभा निवडणुकीमध्ये मी ज्या उमेदवारांच्या विरोधात निवडणुकीला उभा होतो. पण आता निवडणुकीचा निकाल लागला, निवडणूक झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका टिप्पणी करणे योग्य नाही. मी कालही एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, झालं गेलं सोडून द्यायचं. विखे कुटुंबिय हे जिल्ह्यात मोठं कुटुंबिय असून त्यांचं सहकार क्षेत्रात मोठं काम आहे. निवडणूक लढवत असताना त्यांच्या विरोधात बोलणं योग्य आहे. निवडणुकीत बोललं नसतं तर उमेदवार काहीच बोलत नाही, असंही म्हटलं गेलं असतं. निवडणुकीच्या प्रचारात बोलताना एखादा शब्द माझ्याकडून त्यांच्यावर घसरला असेल किंवा त्यांच्याकडून माझ्यावर घसरला असेल. पण आता तेच मनावर घेऊन बसायचं का?”, असं निलेश लंके यांनी म्हटलं.
हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, “रवींद्र वायकरांचा विजय मेरिटवर, ईव्हीएम…”
“मलाही हे मान्य करावे लागेल की जिल्ह्यात सहकार क्षेत्रात विखे कुटुंबियाचं मोठं काम आहे. मी ज्यावेळी राज्यात फिरतो त्यावेळी मी अभिमानाने सांगतो की, आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी केला. मलाही अभिमान आहे. जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर मी अभिमानाने सांगतो की, राज्याचे महसूल मंत्री माझ्या जिल्ह्यातील आहेत. हा अभिमान आपण सांगितला पाहिजे. ते विरोधक असले तर त्यांच्याविरोधात काहीही बोलायचं का?”, असंही निलेश लंके म्हणाले.
मंत्री विखेंचे आशीर्वाद घेणार
पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले, “आता जिल्ह्याचे पालकमंत्री हे राधाकृष्ण विखे पाटील आहेत. जिल्हा नियोजन समितीची असली की मी सुद्धा त्यांना सांगेल की मला आशीर्वाद द्या. मीही त्यांच्याकडे एखादे काम घेऊन जावू जाईल. मी हक्काने त्यांना बोलू शकतो. अशा पद्धतीचे राजकारण असलं पाहिजे. आपण लहान माणसांनी लहान माणसासारखं वागलं पाहिजे”, असं निलेश लंके यावेळी म्हणाले.