लोकसभा निवडणुकीच्याआधी निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर निलेश लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. मात्र, आता निलेश लंके यांच्याबाबत अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना गौप्यस्फोट केला.

‘निलेश लंके आमच्याकडून लोकसभा लढवण्यास तयार होते. पण त्यांना लोकसभा आणि त्यांच्या पत्नीला विधानसभा द्या, अशी अट लंकेंनी ठेवली होती’, असं विधान अजित पवारांनी केलं. आता अजित पवारांच्या या विधानानंतर निलेश लंकेंनी प्रत्त्यु्त्तर दिलं. “लोकसभा निवडणुकीवर आता बोलणं म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणणं चुकीचं आहे”, असा खोचक टोला निलेश लंकेंनी (MP Nilesh Lanke) अजित पवारांना लगावला आहे.

निलेश लंके काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधानसभेच्या २८८ जागांचा सर्व्हे करण्यात येत असल्याची चर्चा आहे. तसेच या सर्व्हेमध्ये ज्या जागा पुढे असतील त्या सर्व जागांवर अजित पवार गट दावा करण्याची शक्यता आहे. यावर निलेश लंके म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीमधील एका घटक पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा आणि महायुतीचा कुठल्या जागा कोणी लढवायच्या आणि कुठल्या जागा नाही लढवायच्या हा अधिकार त्यांचा आहे. त्यामुळे आपण त्यावर भाष्य न केलेलं चांगलं. शेवटी आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. त्यामुळे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीने विधानसभेच्या जागा निवडून आणता येतील याचा विचार आम्ही करणं अपेक्षित आहे”, असं निलेश लंके म्हणाले.

हेही वाचा : “चार महिन्यांत केंद्रातील सरकार…”, शेकापचे नेते जयंत पाटील यांचं मोठं विधान

निलेश लंकेंचा अजित पवारांना टोला

निलेश लंके आमच्याकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार होते. पण त्यांनी अट ठेवली होती, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. यावर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, “आता लोकसभेची निवडणूक झाली आहे. त्यामुळे त्या गोष्टीला काही अर्थ राहिला नाही. मी खासदार झालो तिकडे माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील हे देखील खासदार झाले आहेत. त्यामुळे आता शिळ्या कढीला ऊत देणं चुकीचं आहे”, असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.

अजित पवार लंकेंबाबत काय म्हणाले होते?

“निलेश लंके माझ्याकडून लोकसभा निवडणूक लढवायला तयार होते. मला लोकसभेची उमेदवारी द्या आणि माझ्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी द्या अशी अट निलेश लंकेंनी ठेवली होती. मी भाजपाच्या लोकांशी बोललो होतो, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी सुजय विखे पाटील विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी ही जागा सोडली नाही. ही जागा धोक्यात आहे, असं आपण भाजपाच्या नेत्यांना सांगितलं होतं”, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते.

Story img Loader