राज्यात विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सध्या विविध ठिकाणी नेते मंडळीच्या सभा, मेळावे सुरु असल्याचं चित्र दिसून येत आहे. या बरोबरच महाविकास आघाडी आणि महायुतीत विधानसभेच्या जागावाटपाबाबतही खलबतं सुरु आहेत. आगामी विधानसभा निवडणूक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या सांगलीच्या दौऱ्यावर आहेत.
आज कवठे एकंदमध्ये शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला. “राजकारण करायचं असतं पण कायमच नाही, आपलं घर, शेती सांभाळून राजकारण केलं पाहिजे”, असं शरद पवार यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हटलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
“अनेक शेतकरी उसाचे पीक घेतात. उसाचं पीक घेत असताना एकदा ऊस लावण्यासाठी शेती तयार केली, सरी काढली, उस लावला की त्यानंतर पहिली बांधणी, दुसरी बांधणी करतात. तसेच खत-पाण्याची व्यवस्था केली की त्यानंतर साखर कारखान्याचा अधिकारी उसाची पाहणी करण्यासाठी कधी येतो आणि उसाच्या तोडीची तारीख कधी मिळते. याशिवाय आपण काही काम करत नाही”, असं शरद पवार म्हणाले.
“उसाची शेती करत असताना सुरवातीचं काम केलं का? त्यानंतर शेतीकडे जास्त पाहायची आवश्यकता येत नाही. मग आपण जगभरातील राजकारणाच्या चर्चा गावाच्या ठिकाणी करत बसतो. मात्र, आपण हे पाहत नाही की आपल्या जमिनीचं नेमकं काय होतंय? पंचायत समितीची निवडणूक असो किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक असो. यामध्ये आपण पुरेपूर लक्ष घालतो, म्हणजे यामध्ये लक्ष घालायला हरकत नाही. मात्र, तेवढं एकच काम आपल्याला असते का? राजकारण करायचं असतं, पण कायमचं नाही. आपले घर, शेती सांभाळून राजकारण करण्यात शहाणपण आहे. मात्र, अलिकडच्या काळात याची कमतरता पाहायला मिळते”, असं शरद पवार शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हणाले.