शिंदे गटाकडून भाजपाकडे केंद्रात दोन मंत्रिपद आणि दोन राज्यपाल पदांची मागणी करण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी यावरून आता शिंदे गट आणि भाजपाला टोला लगावला आहे.
केंद्रात दोन मंत्रिपदं आणि दोन राज्यपाल पदं मागणं म्हणजे शिंदे गटाचा बालहट्ट आहे. भाजपाने शिंदे गटाचा हा बालहट्ट पुरवावा, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी टोला लगावला आहे.
“भाजपाला फार मोठा आधार शिंदे गटाकडून मिळाल्याचं भासवलं जात असल्यामुळेच केंद्रातील दोन मंत्रिपदं खरंतर दोन म्हणजे सुद्धा कमी आहेत, जास्त असली पाहिजेत आणि राज्यपाल पदं दोनच का त्यापेक्षाही अधिक असली पाहिजेत., कारण शिंदे गटाकडे या सगळया पदासांठी लायक असणाऱ्यांची संख्या खूप मोठी असल्याने, कदाचित यापेक्षाही जास्त मागणी त्यांनी केली पाहिजे आणि त्यांचा हा बालहट्ट भाजपानेही पुरवला पाहिजे.” असं खासदार सुनील तटकरे यांनी टीव्ही 9 शी बोलताना म्हटलं आहे.