महायुतीबरोबर जाण्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जात असताना मास्क आणि टोपी घालून म्हणजे वेश बदलून दिल्लीला जात असायचे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत त्यांनीच पत्रकारांबरोबरच्या अनौपचारिक गप्पामध्ये सांगितल्याचं बोललं जातं. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता यासंदर्भात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “अजित पवार हे गृहमंत्री अमित शाह यांना चोरून का भेटत होते? त्यांच्यामध्ये एवढं काय शिजत होतं?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या वेश बदलून दिल्लीला जात असल्याच्या चर्चांवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजित पवार हे नाव आणि वेश बदलून ते दिल्लीला जात असत असं त्यांनीच म्हटलं आहे. याबाबत मला तीन ते चार प्रश्न वाचारायचे आहेत. त्यावेळी तु्म्ही विरोधी पक्षनेते होतात. मग विरोधी पक्षनेते असतानाही तुम्ही अमित शाह यांना का भेटत होतात? आता तुम्ही हे ही कबूल केलं आहे की तुम्ही अमित शाह यांना चोरून भेटत होतात. त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधात बोलत होतात आणि दुसरीकडे दिल्लीत त्यांच्याच नेत्यांना भेटत होतात. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राशी गद्दारी केली”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
हेही वाचा : Nana Patole : “काँग्रेसमध्ये नानाभाऊ-विजयभाऊ; एकमेकांना फाडून खाऊ अशी स्थिती”, जुन्या सहकाऱ्याची बोचरी टीका
खासदार सुळे पुढे म्हणाल्या, “दुसरा मुद्दा असा आहे की, अजित पवार सातत्याने नाव बदलून दिल्लीला जात होते. पण हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांना विमानाने यायचं म्हटलं तर आधार कार्ड लागतं. आता अजित पवारांनी असं केलं तर उध्या एखादा दहशतवादी असं करेल. तोही नाव बदलून येईल. याची जबाबदारी कोण घेणार? यामध्ये मुंबई आणि दिल्ली विमानतळाची चौकशी झाली पाहिजे. तसंच एअरलाईन्सची देखील चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
“तुम्ही ज्या माणसांना ओळखत नाही, त्या माणसाला एअरलाईन्सने परवानगी कशी दिली? याबाबत केंद्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे. एवढे लोक विमानाने फिरतात, मग या देशात काहीच सुरक्षा नाही का? माझा हा प्रश्न आहे की अजित पवार हे अमित शाह यांना असं चोरुन का भेटत होते? त्यांच्यामध्ये असं काय शिजत होतं?”, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.