महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच करण्यात आला आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप असलेले शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. आज त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून भाजपावर टीकास्र सोडलं आहे.
भारतीय जनता पार्टीनं संजय राठोडांची, त्यांच्या बायकोची, मुलांची आणि बंजारा समाजाची माफी मागावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्यासारख्या गंभीर आरोप असणाऱ्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता सुप्रिया सुळेंनी भाजपावर टीका केली आहे.
यावेळी त्या म्हणाल्या की, “संजय राठोडांबद्दल आमचं मत त्यादिवशीही तेच होतं आणि आजही तेच आहे. कारण आम्ही तेव्हाही म्हणत होतो की पूर्ण तपास होऊ द्या, घाईघाईने त्यांच्या राजीनाम्याचा आग्रह करू नका. पण भारतीय जनता पार्टीनेच राजीनाम्याचा फार आग्रह केला. त्यांना तुरुंगात टाकण्यापर्यंतची भाषा केली. आता त्यांनीच संजय राठोड यांना क्लिन चीट देऊन सरकारमध्ये आणलं आहे.”
“त्यामुळे संजय राठोड यांच्या वतीने आमची भाजपाला विनंती आहे की, त्यांनी संजय राठोडांची, त्यांच्या बायकोची, मुलांची आणि बंजारा समाजाची माफी मागायला हवी. कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करता, तेव्हा संबंधित कुंटुंब किंवा समाज कोणत्या परिस्थितीतून जातो, हे भाजपाला कळायला हवं. खरं तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागायला हवी. तसेच पूजा चव्हाण या महाराष्ट्रातील मुलीवर कुणी अन्याय केला? याचा तपास व्हायला हवा. ती महाराष्ट्राची लेक आहे. त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.