महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले नाहीत. त्यामुळे जिल्हास्तरावर अनेक प्रश्नांचा खोळंबा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. या नवीन सरकारचा हनिमून आणखी किती दिवस टिकणार आहे, हेच मला कळत नाही, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.
“महाराष्ट्राला आणि पुणे जिल्ह्याला एक पालकमंत्री मिळावा म्हणून मी देव पाण्यात घालून बसलेय, मला अनाथ झाल्यासारखं वाटतंय. दोन महिने झाले पण अद्याप पालकमंत्री मिळाले नाहीत. अजित पवार पालकमंत्री होते, तेव्हा कुठल्याही पक्षाचा माणूस हक्काने अजित पवारांना भेटायचा. आमच्या वैचारिक विरोधकांनाही विचारा, अजित पवारांनी कधीही कुणाला विकासकामांना नाही म्हटलं नाही. सरकार स्थापन होऊन दोन महिने उलटले तरीही आपल्याला अद्याप पालकमंत्री मिळाला नाही” अशी खोचक टीका सुळे यांनी केली आहे. त्या एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
हा हनिमून आणखी किती दिवस टिकणार- सुळे
राज्यातील आणि पुणे जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “विमानतळ होणार की नाही? जलजीवन मिशनचं काय होणार? शाळा, अंगणवाड्यांचं काय होणार? आम्ही विरोधक असलो तरी माझी इच्छा आहे की कोणत्याही सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण करावा. कारण त्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातो. ज्या पद्धतीने धमक्या दिल्या जात आहेत. पण कामं मात्र होत नाहीयेत. त्यामुळे नवीन सरकारचा हनिमून आणखी किती दिवस टिकणार आहे, हे मला कळत नाही. भारतीय जनता पार्टी ही एक सुसंस्कृत पार्टी आहे, असं मला वाटायचं. पण त्यांचा मित्रपक्ष अशाप्रकारे धमक्या देत आहेत, हे भाजपाला कितपत पटतंय? हा एक गंभीर आणि चिंतेचा विषय आहे.”